सागवानांची अवैध कटाई करून तस्करांनी तयार केला कच्चा रस्ता

वनपरिक्षेत्राचा संशयास्पद कारभार

देसाईगंज : वडसा वनविभागाच्या पुराडा वनपरिक्षेत्रात सागवान चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल 9 मौल्यवान सागवान वृक्षांची अवैध कटाई करून चोरट्यांनी मुख्य रस्त्यालगतच मुरूम टाकून पळवाटेसाठी नवीन रस्ताच तयार केला आहे. विशेष बाब म्हणजे, ही घटना वनपरिक्षेत्र कार्यालयापासून अवघ्या 2.5 किमी अंतरावर आणि मुख्य मार्गालगत घडली, तरीही संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी, वनक्षेत्र सहाय्यक आणि वनरक्षकांना याची कल्पनाच नव्हती, असा दावा करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, हा प्रकार रामगड उपक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या रामगड नियत क्षेत्र कक्ष क्र.241 मधील आहे. या अवैध कटाईत चोरट्यांनी चक्क मशिनचा वापर केल्याचे ठळक पुरावे घटनास्थळी आढळून आले. सागवानाच्या 9 थव्यांचे (stumps) अवशेष आणि नव्याने टाकलेला मुरूमाचा रस्ता यावरून संगनमताने हा प्रकार घडल्याचे स्पष्ट दिसत आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करून हे प्रकरण वरिष्ठांपासून लपविण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेत सागवानाचे 9 झाड कापण्यात आले. यामुळे संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून त्यांच्याकडून अवैध कटाईचा संपूर्ण दंड वसूल करण्याची मागणी आम आदी पार्टीने केली आहे.

यासंदर्भात आम आदमी पार्टीच्या गडचिरोली जिल्हा अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्ष सत्यवान रामटेके यांनी गुरुवारी (20 नोव्हेंबर) गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक रमेश कुमार यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यात पुराडा वनपरिक्षेत्र अधिकारी आर.एच.चौधरी, वनक्षेत्र सहाय्यक बी.यु.तागडे आणि वनरक्षक टी.आर.भुरकुडे या तिघांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.