प्रतिबंधीत सुगंधी तंबाखूची वाहतूक आणि साठ्यावर अहेरी पोलिसांची धाड

वांगेपल्ली, आलापल्लीत 8 लाखांचा माल जप्त

अहेरी : पोलिसांची नजर चुकवून प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची वाहतूक करणारे वाहन अहेरी पोलिसांनी पकडले. वांगेपल्ली घाटावर केलेल्या या कारवाईत 6 लाख 90 हजारांचा तंबाखू आणि 13 लाखांचे वाहन जप्त केले. याशिवाय आलापल्लीतील बजरंग चौकातील धोबे यांच्या घरातून 40 डबे तंबाखू जप्त केला. त्याची किंमत 1 लाख 12 हजार रुपये आहे.

वांगेपल्ली घाटावरील कारवाईत रुनाल झोरे (रा.आलापल्ली), अन्सार शेख (रा.अहेरी) आणि अन्य एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. तत्पूर्वी पेट्रोलिंग सुरू असताना आलापल्ली येथे दामोधी धोंडीबा धोबे आणि प्रवीण दामोधर धोबे, दोघेही रा.बजरंग चौक, आलापल्ली यांच्या घरी धाड टाकून सुगंधी तंबाखू जप्त केला. प्रत्येकी 935 रुपये किंमतीचे एकूण 40 डबे तंबाखू आढळला. तो जप्त करण्यात आला. हवालदार प्रशांत कांबळे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलीस निरीक्षक स्वप्निल इंदपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र पटले, पोलीस उपनिरीक्षक चैतन्य घावटे, राजू गवळी, प्रशांत कांबळे, दादा रायसिडाम यांच्या पथकाने केली.