चक्क मालवाहू वाहनातून सुरू होती 16 लाखांच्या देशी दारूची वाहतूक

जिमलगट्टा पोलिसांनी पकडला मुद्देमाल

गडचिरोली : दारुबंदी असताना अवैधरीत्या छुप्या पद्धतीने दारुची आयात आणि विक्री करणाऱ्यांना अंकुश लावण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार जिमलगट्टा उपपोलीस स्टेशनने मोठी कारवाई केली.यात चक्क एका मालवाहू पीकअप वाहनातून आलेली 16 लाख 80 हजार रुपयांची देशी दारू पकडण्यात आली.

हे पिकअप वाहन जिमलगट्टा ते देचलीपेठा मार्गाने अवैधपणे दारुची वाहतूक करत होते. गोपनिय माहितीवरुन उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत दसूरकर, प्रभारी अधिकारी सपोनि संगमेश्वर बिरादार व त्यांच्या पथकाने मार्गात सापळा लावला. त्यात भरधाव वेगाने येणारे वाहन थांबवून चौकशी केली असता सत्यप्रकाश यादव रा.जिमलगट्टा हा दारूची वाहतूक करत असल्याचे आढळले.

त्या वाहनात रॉकेट या देशी दारुचे 210 कागदी कर्टन बॉक्स होते. प्रति बॉक्स 100 नग याप्रमाणे एकुण 21,000 नग देशी दारुच्या बॉटल त्यात होत्या. या 16 लाख 80 हजार रुपयांच्या दारुसह वाहतुकीकरीता वापरलेले चारचाकी महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन, असा एकुण 20 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उपनिरीक्षक आनंद गिरे व त्यांच्या पथकाने केली.