गडचिरोली : गेल्या 13 मे रोजी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या कटरानगट्टा जंगलातील चकमकीची उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. या चकमकीनंतर एका पुरूष नक्षलीसह दोन महिला नक्षलींचा मृतदेह आढळला होता.
नारगुंडा पोलीस स्टेशनअंतर्गत कटरानगट्टा जंगल परिसरात झालेल्या सदर मृत व्यक्तींच्या मृत्युच्या कारणांचा शोध लावण्यासाठी दंडाधिकारी चौकशी करण्यात येणार आहे. या घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी आपले लेखी निवेदन शपथपत्रासह उपविभागीय दंडाधिकारी एटापल्ली यांच्या न्यायालयात 15 दिवसांच्या आत सादर करावे, असे उपविभागीय दंडाधिकारी आदित्य जिवने यांनी कळविले.
चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी स्वत: पाहिल्याप्रमाणे घटनेचे वर्णन करून या घटनेविषयीचा अनुभव, घटनेनंतर किंवा आधी या घटनेशी संबंधित काही घटना घडली असल्यास त्याविषयी माहिती, सरकारी किंवा अन्य यंत्रणेच्या प्रतिक्रिया किंवा सहभाग, याविषयी आपले म्हणणे किंवा या घटनेशी संबंधित इतर कोणतीही माहिती असल्यास तसे निवेदन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.