गडचिरोली : मूळच्या छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्याची रहिवासी असलेल्या आणि भामरागड तालुक्यात नक्षल चळवळीत सहभागी असलेल्या लक्ष्मी बंडे मज्जी (42 वर्ष) या महिला माओवाद्याने शनिवारी गडचिरोलीत आत्मसमर्पण केले. जिल्हा पोलीस दल आणि सीआरपीएफसमोर तिने शरणागती पत्करत नक्षल चळवळ सोडून शांततेने जीवन जगण्याचा मार्ग पत्करला.
लक्ष्मी ही लहान असताना गावात माओवाद्यांच्या मिटींगदरम्यान गावातील लोकांसोबत माओवाद्यांना जेवन नेऊन देत होती. सन 2017 पासून भामरागड व इंद्रावती एरिया कमिटीमध्ये चेतना नाट्यमंच) मध्ये ती सदस्यपदावर भरती होऊन आजपर्यंत कार्यरत होती.
दलममध्ये असताना माओवाद्यांना जेवण व इतर आवश्यक साहित्य पुरविण्याची जबाबदारी तिच्यावर होती. याशिवाय इतर कोणत्या हिंसक घटनांमध्ये तिचा सहभाग होता का, याची पडताळणी करणे सुरु आहे.
दलममध्ये विवाह झालेल्यांनाही स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही. अहोरात्र भटकंतीचे जीवन आहे. स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही. जेष्ठ माओवाद्यांकडून स्त्रीयांना भेदभावजनक वागणूक दिली जाते. दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी चळवळीकरीता, जनतेकरीता पैसे गोळा करायला सांगतात. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी हा पैसा कधीच वापरल्या जात नाही. खबरी असल्याच्या संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात. चकमकीदरम्यान पुरुष माओवादी पळून जाण्यात यशस्वी होतात, मात्र महिला पोलिसांच्या गोळीबारात ठार मारल्या जातात, इत्यादी कारणांमुळे नक्षल चळवळीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे लक्ष्मीने पोलिसांना सांगितले.