गडचिरोली : दारुबंदी असताना चंद्रपूर जिल्ह्यातून एका कारमधून देशी-विदेशी दारू आणून ती आलापल्लीतील अवैधपणे दारू व्यवसाय करणाऱ्यांना पुरविणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. या कारवाईत कारसह एकूण 8.69 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या दारू तस्करीची गोपनिय माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आलापल्ली येथील सावरकर चौकात सापळा लावला होता. संशयित वाहनाला (एम एच 20, ई जे 5272) पोलिसांनी थांबवून तपासणी केली असता त्यात संत्रा देशी दारूचे 31 बॉक्स (किंमत 2,48,000 रुपये), रॉयल स्टॅग व्हिस्कीचे 7 बॉक्स (किंमत 1,47,000 रुपये), हेवर्ड बियरचे 14 बॉक्स (किंमत 1,00,800 रुपये), ऑफिसर चॉईस व्हिस्कीच्या 2 पेट्या (42,000 रुपये), ट्यूबर्ग बियरचे 3 बॉक्स (21,600 रुपये) असा देशी व विदेशी दारुचा अवैध मुद्देमाल मिळून आला.
यासह दारू वाहतुकीसाठी वापरलेली कार (किंमत 3,00,000 रुपये) आणि मोबाईल असा एकूण 8 लाख 69 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहन चालक पंकज शर्मा याने चौकशीत दिलेल्या माहितीनुसार तो आणि त्याचा सहकारी सुलतान शेख दोघेही रा.चंद्रपूर यांनी हा मुद्देमाल किशोर डांगरे व पप्पी झोरे, दोघेही रा.आलापल्ली यांच्या सांगण्यावरुन आलापल्ली येथे आणला होता. त्यामुळे या चारही आरोपींवर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपी चालक पंकज अशोक शर्मा याला अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्था.गु.शाखा गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात स.पो.नि. भगतसिंग दुलत, चापोशि दीपक लोणारे यांनी पार पाडली.
































