गडचिरोली : देशी-विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या शिवणी येथील इसमाची कार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पकडली. शहरालगतच्या सेमाना मंदिराजवळ केलेल्या या कारवाईत 6 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल पकडून मनोज उईके या आरोपीला अटक करण्यात आली. ज्यांच्याकडून हा माल घेतला होता त्या किरण ताटपल्लीवार आणि लखन उर्फ लंकेश यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला.

या कारमध्ये 25 पेट्या देशी दारू आणि 4 पेट्या बिअरच्या बाटल्या होत्या. त्या सर्व मालासह स्विफ्ट कार जप्त करण्यात आली. सदर कार आरोपी मनोज उईके याच्याच मालकीची आहे. दारूची खेप पोहोचवण्यासाठी तो या कारचा वापर करत होता. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सेमाना मंदिराजवळ सापळा रचण्यात आला होता. रविवारी पहाटे उईके त्यात अडकला. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास एएसआय कैलास नरोटे करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात स.पो.नि. भगतसिंग दुलत, हवालदार दंडीकवार, अंमलदार पंचफुलीवार व कोडाप यांनी पार पाडली.
 
            
