एलसीबीच्या पथकाने पकडली 14 लाखांची ‘ऑफिसर चॅाईस’

माल सापडला, पण मालक गायब

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातल्या बामणी उपपोलीस स्टेशनच्या हद्दीतील जाफराबाद या गावात अवैधपणे साठा करून ठेवलेली तब्बल 14 लाख 47 हजार रुपयांची ‘ऑफिसर चॅाईस’ ही विदेशी दारू गडचिरोलीतील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली. मात्र पोलिसांची चाहुल लागताच ज्या घरात ही दारू साठवून ठेवली होती तो त्याचा घरमालक गायब झाला. संदीप देवाजी दुर्गम असे त्याचे नाव असून त्याचा शोध सुरू आहे.

दारुबंदी असतानाही जिल्ह्यात अवैधरीत्या छुप्या पद्धतीने दारुची आयात करून विक्री होत असल्याने त्याला अंकुश लावण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात कुठे-कुठे अशा पद्धतीने दारूचा साठा करून विक्री केली जाते याची माहिती काढून संबंधितांवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाया सुरू केल्या आहेत.

गोपनिय माहितीनुसार, सिरोंचा तालुक्यातील जाफराबाद येथील संदीप देवाजी दुर्गम याने अवैधपणे विदेशी दारूचा साठा करून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) मिळाली होती. त्यानुसार दोन पंचांसमक्ष धाड टाकून दुर्गम याच्या घराची झडती घेत असताना आरोपी दुर्गम याने पळ काढला. घराच्या झडतीत 90 मिली क्षमतेच्या ऑफिसर चॉईस कंपनीच्या 11 हजार 136 नग बाटल्या, ज्यांची प्रतिनग अवैध विक्री किंमत अंदाजे 130 रु.प्रमाणे आहे, असा एकूण 14 लाख 47 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईनंतर बामणी उपपोलीस स्टेशनमध्ये कलम 65 (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये आरोपी संदीप देवाजी दुर्गम रा.जाफराबाद याच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोउपनिरीक्षक शाहू दंडे करीत आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात पोउपनि. विकास चव्हाण, हवालदार प्रेमानंद नंदेश्वर, अंमलदार निशिकांत अलोने, चालक गणेश वाकडोपवार यांनी पार पाडली.