गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वेगवेगळ्या मार्गाने आणि पोलिसांना गुंगारा देऊन दारूची आयात केली जाते. त्यांची अनेक वाहनेही पोलीस अधूनमधून पकडत असतात. पण पोलिसांना गुंगारा देण्यासाठी चक्क रुग्णांच्या सेवेसाठी असलेल्या रुग्णवाहिकेचा वापर करून दारूची तस्करी करण्याचा गंभीर प्रताप पिपली बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कंत्राटी डॅाक्टरने केला आहे. ब्रह्मानंद रैनू पुंगाटी (29 वर्ष, रा.बारसेवाडा, ता.एटापल्ली) असे त्याचे नाव असून त्याला आरोग्य सेवेतून तात्काळ सेवामुक्तही करण्यात आले.
ही घटना 15 सप्टेंबरच्या पहाटे घडली. प्राप्त माहितीनुसार, हालेवारा पोलीस मदत केंद्राचे पथक पहाटे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत असताना तेथून पिपली बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेच्या चालकाने गाडी वेगाने पुढे काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना त्या रुग्णवाहिकेवर संशय आला. पोलिसांनी पाठलाग करत रुग्णवाहिका थांबवून तपासणी केली असताना आत चक्के देशी दारूचे 10 बॅाक्स आणि विदेशी दारूच्या 96 बाटल्या असा मुद्देमाल आढळला.
विशेष म्हणजे या रुग्णवाहिकेत डॅा.ब्रह्मानंद पुंगाटी याच्याशिवाय आरोग्य विभागाचा कोणीही कर्मचारी नव्हता. रुग्णावाहिकेचा चालक शशिकांत बिरजा मडावी (33 वर्ष, रा.एटापल्ली), सौरभ गजानन लेखामी (20 वर्ष, रा.पिपली बुर्गी), भिवाजी रैनू पदा (31 वर्ष, रा.पिपली बुर्गी) हे सर्व दारू तस्करी करणारे लोक बिनबोभाटपणे दारूची ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर करत होते. ही रुग्णवाहिका पिपली बुर्गी आरोग्य केंद्राची असून तेथील प्रभारी अधिकारी डॅा.पुंगाटी याच्याशी संगनमत करून हा सर्व प्रकार सुरू होता. हा प्रकार कधीपासून सुरू होता आणि त्याबाबत आतापर्यंत कुठे वाच्यता का झाली नाही, याचा निष्पक्षपणे तपास करण्याचे आव्हान आता पोलिसांपुढे आहे. पण एटापल्लीच्या एसडीपीओंनी या प्रकरणी आरोपीबाबत सहानुभूतीपूर्ण भूमिका घेतल्यामुळे या प्रकरणाचा तपास त्यांच्या मार्गदर्शनात पारदर्शकपणे होईल का, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
हालेवारा पोलिसांनी डॅा.पुंगाटी याच्यासह इतर तीनही आरोपींना अटक केली असून त्यांचा दोन दिवसांचा पीसीआर मिळवला आहे. बुधवारी (दि.18) या आरोपींना पुन्हा न्यायालयापुढे हजर केले जाईल. दरम्यान डॅा.पुंगाटी याला जिल्हा परिषदेच्या रुग्णसेवेतून कार्यमुक्त करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.प्रताप शिंदे यांनी सांगितले.
एसडीपीओ म्हणतात, पत्रकारांना माहिती देऊ नका !
आश्चर्याची गोष्टी म्हणजे ज्या हालेवारा पोलीस मदत केंद्रांतर्गत हा गुन्हा दाखल झाला तेथील प्रभारी अधिकारी पो.उपनिरीक्षक अक्षय पाटील यांना या घटनेची माहिती विचारली असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. एसडीपीओंनी पत्रकारांना माहिती देऊ नका, असा आदेश दिला असल्याचे ते म्हणाले. डॅाक्टरची उगीच बदनामी होते, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. रुग्णांची सेवा सोडून रुग्णवाहिकेला दारू तस्करीच्या कामात लावण्याचा गंभीर आणि निषेधार्ह गुन्हा करणाऱ्या डॅाक्टरचा एटापल्लीचे एसडीपीओ चैतन्य कदम यांना एवढा कळवळा का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेची माहिती लपवून ठेवण्यामागे डॅाक्टरच्या बदनामीचे कारण देत स्वत:ची नामुष्की टाळण्याचा तर संबंधित अधिकाऱ्यांचा प्रयत्न नव्हता ना, अशी शंका घेतली जात आहे.