‘त्या’ युवतीच्या मारहाण प्रकरणावरून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न

आरोपीच्या पत्नीसह एमआयएमचा आरोप

Oplus_131072

गडचिरोली : आरमोरी येथील एका रेस्टॅारंटमध्ये काम करणाऱ्या प्रियंका रॅाय या युवतीला 15 आॅगस्ट रोजी बेदम मारहाण करण्याच्या प्रकरणात अर्धवट माहिती समोर आणण्यात आली. तसेच या प्रकरणाला विनाकारण जातीय रंग देत सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आरोपीच्या पत्नीसह एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा आरोप केला. याशिवाय पोलीस अधीक्षकांनाही निवेदन दिले.

एमआयएमचे जिल्हाध्यक्ष बाशिद शेख, महिला जिल्हाध्यक्ष आयेशा अलील, आरोपी सोहेल शेख याची पत्नी निदा शेख, तसेच निलोफर शेख आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषद घेऊन या प्रकरणाची दुसरी बाजू मांडली. त्या युवतीला आरोपी सोहेल शेख याने केलेल्या मारहाणीचे आम्ही समर्थन करत नाही. ते कृत्य चुकीचेच होते. पण त्यापूर्वी घडलेला घटनाक्रम समोर आणण्यात आला नाही. त्या युवतीला मोबाईल चार्जर मागितल्यानंतर तीने अर्वाच्य शब्दात शिवीगाळ केली. यामुळे झालेल्या वादावादीत त्या युवतीने काऊंटरजवळील स्टिल रॅाड मारण्यासाठी उचलला. पण तेथील काकांनी तिच्या हातून रॅाड हिसकून घेतला. या प्रकारामुळे मी घाबरून पतीला फोन केला. त्यानंतर मी बेशुद्ध झाली. पती बाशिद शेख आल्यानंतर त्यांनी पाणी मारून मला शुद्धीवर आणले. पण या सर्व घटनाक्रमाचे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आल्याचा आरोप निदा शेख व एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

गडचिरोली जिल्ह्यात हिंदू-मुस्लिम असा वाद कुठेही नसताना या प्रकरणाला जातीय रंग देऊन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.