आई आणि मुलाने रागाच्या भरात केली दारूड्या वडीलांची हत्या

व्यसनाने झाली कुटुंबाची वाताहत

भामरागड : तालुक्यातील मिरगुळवंचा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दोबूर गावात एका दारूड्या वडिलाच्या छळाला कंटाळून रागाच्या भरात मुलगा आणि त्याच्या आईने वडिलांची हत्या केली. लाकडाने डोक्यावर वार केल्याने प्रितम बहादूर एक्का (50 वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मुलगा आणि आईला पोलिसांनी अटक केली.

प्राप्त माहितीनुसार, भामरागड तालुका मुख्यालयापासून 10 किमी अंतरावर असलेल्या दोबूर या गावातील प्रीतम बहादूर एक्का याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे तो दारूच्या नशेत नेहमी पत्नी आणि मुलाला त्रास देत होता. त्याच्या या सवयीमुळे दोन वर्षापूर्वी त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला होता.

बुधवारी सकाळी तो आरेवाडा येथे बाजारासाठी गेला होता. तिकडून दारू पिऊन आल्यानंतर त्याने जेवण करत असलेल्या पत्नी मानती (40 वर्ष) हिच्याशी वाद घालणे सुरू केले. त्यातून तो पत्नीला मारायला सरसावला. त्यामुळे मानतीसह तिचा मुलगा जोसेफ (22 वर्ष) यांचा राग अनावर झाला. यावेळी मानती हिने जवळ पडलेल्या लाकडाने पतीवर वार केला. त्यानंतर जोसेफ यानेही लाकडाने वडीलांवर प्रहार करून त्यांना कायमचे शांत केले.

या घटनेच्या वेळी गावातील बहुतांश लोक बेल कटाईसाठी जंगलात गेले होते. मृत प्रीतमची आई मानकुवारी बहादूर एक्का (65 वर्ष) हीसुद्धा शेतात गेली होती. घरी परतल्यावर तिला हा प्रकार दिसल्यानंतर तिने आरडाओरड केली. पण प्रितमचा जीव निघून गेला होता.

आरोपी जोसेफ याची लहान भावंडं शाळेत शिकतात. दोघे मायलेक तुरूंगात गेल्याने घरात आता आजी आणि नातवंड हेच राहिले आहेत. दारूच्या व्यसनाने या कुटुंबाची वाताहात केली.