गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेल्या कल्पना उंदीरवाडे यांची रविवारी (दि.13) दुपारी त्यांच्याच घरी निर्घृणपणे हत्या झाली, पण या घटनेला 36 तास लोटल्यानंतरही पोलिसांच्या हाती ठोस असे काहीही लागलेले नाही. विशेष म्हणजे उंदीरवाडे यांच्या अंगावरील आणि घरातील दागिनेसुद्धा सुरक्षित होते. त्यामुळे ही हत्या चोरीच्या उद्देशाने झालेली नसल्याचे स्पष्ट झाले असून या हत्येचे गूढ आणखीच वाढले आहे.
नवेगाव परिसरातील सुयोगनगरचा परिसरत रविवारी दुपारी उघडकीस आलेल्या या घटनेने हादरून गेला आहे. उंदीरवाडे यांचा दत्तक पूत्र घरी नसताना भर दुपारी लोखंडी रॅाडसारख्या जड वस्तूने डोक्यावर प्रहार करून ही हत्या झाली. घरकाम करणारी महिला दुपारी कामं करण्यासाठी आली असताना या हत्येचा उलगडा झाला. यावेळी घराची दारं उघडी होती. शिवाय घरातील टिव्हीसुद्धा सुरू होता. पण कल्पना उंदीरवाडे रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या होत्या.
गडचिरोली पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या हत्येचा उलगडा करण्यासाठी वेगवेगळ्या दिशेने तपासचक्र फिरवत आहेत. पण अद्यापपर्यंत काहीही ठोस हाती लागलेले नाही. श्वानपथक, ठसेतज्ज्ञांनाही पाचारण केले होते. मात्र श्वानपथक तिथेच घुटमळले. म्हणजे हत्या करणारे लोक एखाद्या वाहनातून आले आणि आपले काम आटोपून निघून गेले असण्याची शक्यता आहे. एखाद्या सराईत गुन्हेगारांप्रमाणे खूप कमी वेळेत हा सर्व घटनाक्रम झाला. त्यामुळे कोणी नियोजनपूर्वक कट रचून ही हत्या केली असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. पोलिसांनी एका नातेवाईकाकडे याप्रकरणी सखोल चौकशी केली, पण त्यातून हत्येचा उलगडा होऊ शकेल अशी माहिती मिळाली नाही.
हत्या करणाऱ्या व्यक्तीचा शोध लागणार नाही तोपर्यंत ही हत्या नेमकी कशासाठी केली, याचा उलगडा होऊ शकणार नाही. पोलिसांना यात कधी यश येते याकडे तमाम गडचिरोलीकरांचे लक्ष लागले आहे.