भामरागड : एकीकडे भामरागड तालुक्यात नवनवीन पोलीस स्टेशनची उभारणी करून नक्षलवाद्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे नक्षलवादीही आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. यातूनच एका प्रतिष्ठित नागरिकाची हत्या करण्यात आली.
दोन महिन्यांपूर्वी भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुखराम मडावी यांची हत्या केली होती. त्यानंतर आता जुवी गावातील पुसू गिबा पुंगाटी (60 वर्ष) या प्रतिष्ठित शेतकऱ्याची गळा आवळून हत्या केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मात्र पुंगाटी यांची हत्या करणारे नक्षलवादीच होते की आणखी कोणी, हे अद्याप स्पष्ट नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
धोडराज पोलीस स्टेशनअंतर्गत जुवी गावातील पुंगाटी यांना शनिवारच्या रात्री काही अज्ञात लोकांनी झोपेतून उठवून गावाबाहेर नेले आणि टॅावेलने गळा आवळून त्यांची हत्या केली. घटनास्थळी कोणतेही नक्षल पत्रक किंवा बॅनर आढळलेले नाही. पुंगाटी यांचा पोलिसांशी किंवा नक्षलींसोबत कोणताही संबंध नव्हता, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.
असे असताना त्यांची नक्षलवाद्यांनी हत्या करण्याचे कारण काय, हे समोर आलेले नाही. मात्र पोलिसांना मदत करत असल्याच्या संशयातून नक्षलींनी त्यांची हत्या केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुसू पुंगाटी हे व्यवसायाने शेतकरी आहेत. त्यांनी मेहनतीने आपल्या मुलांना उच्चशिक्षित केले. मोठा मुलगा चिन्ना पुंगाटी हे एटापल्लीच्या राजे धर्मराव महाविद्यालयात प्राध्यापक तर दुसरे किशोर पुंगाटी हे अहेरीच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात वकीली करतात. परिसरात प्रतिष्ठित व्यक्त म्हणून ओळख असलेल्या पुंगाटी यांच्या हत्येबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.