शेतात राहणाऱ्या वृद्ध पती-पत्नीची रहस्यमय हत्या, मृतदेह फेकले नदीत

तपासासाठी पोलिसांची पाच पथके

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातल्या येमली बुर्गी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील करपनफुंडी गावातील एका दाम्पत्याची हत्या करून मृतदेह बांडे नदीत फेकल्याने एकच खळबळ उडाली आहे. यात दि.27 ला पत्नीचा हातापायाला दोरी आणि दगड बांधलेल्या स्थितीतील मृतदेह बांडे नदीत आढळल्यानंतर दि.28 ला तेथून 8 किलोमीटरवर पतीचा मृतदेह नदीपात्रात आढळला. बुरगू रैनू गोटा (65 वर्ष) आणि रैनू जंगली गोटा (70 वर्ष) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. या रहस्यमय घटनेचा उलगडा करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी पाच पथके तयार केली असून चार संशयितांना ताब्यातही घेतले आहे.

गोटा दाम्पत्य शनिवारपासून गायब आहेत. नातेवाईकांनी शोधाशोध केल्यानंतर दि.27 ला सकाळी बुरगू (पत्नी) हिचा नदीपात्रात मृतदेह आढळला. मात्र रैनूचा थांगपत्ता लागलेला नव्हता. या दाम्पत्याची हत्या झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केल्यानंतर नक्षलग्रस्त आणि दुर्ग असलेल्या या भागात पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. त्यात एका पुरूषाचा मृतदेह त्याच नदीपात्रात आढळला. तो रैनूचाच (पती) असावा याची खात्री केली जात आहे. आलदंडी पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

संपत्तीच्या वादातून झाली हत्या?

पुजारी म्हणून काम करणाऱ्या रैनू आणि बुरगू या दाम्पत्याला 6 मुले आणि 2 मुली आहेत. त्यांची हत्या नेमकी कोणी आणि कशासाठी केली याचे रहस्य सध्यातरी कायम आहे. मात्र त्याचा उलगडा करण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात 5 पथके तयार केली आहेत. सदर घटनेची कसून चौकशी करण्यात येत असून 4 संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे. या दाम्पत्याची हत्या जादुटोण्याच्या संशयातून झाली की संपत्तीच्या वादातून हे लवकरच स्पष्ट होईल. एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा या गावात काही महिन्यांपूर्वी जादुटोण्याच्या संशयातून एका महिलेसह दोन जणांना गावकऱ्यांनी जीवंत जाळले होते. तसेच जांभिया (गट्टा) येथील वृद्धाला मारहाण करून गरम सळाखीने चटके दिले होते. यावरून सदर घटनाही त्याच प्रकारच्या संशयातून तर झाली नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. मात्र या घटनेमागील कारण वेगळे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.