Home क्राईम प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून, 5 अटकेत

प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून, 5 अटकेत

पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य उघड

कोरची : चार दिवसांपूर्वी कोरची तालुक्यातील बोगाटोला गावाजवळच्या तलावाजवळ जमिनीत अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळलेल्या एका मृतदेहाचे रहस्य उलगडण्यात कोरची पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून इतर 3 लोकांच्या मदतीने त्या युवकाची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. यातील पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली. आव्हानात्मक असलेल्या या हत्येचा अवघ्या 72 तासात पोलिसांनी उलगडा केला आहे.

सविस्तर वृत्त असे आहे की, मौजा बोगाटोला येथील जंगल परिसरातील तलावाजवळ 31 जानेवारी रोजी अज्ञात इसमाचा मृतदेह अर्धवट पुरलेल्या स्थितीत आढळला होता. मृतदेहाचा चेहरा कुजलेला असल्याने मृताची ओळख पटवून तपास करणे अत्यंत आव्हानात्मक होते. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली कोरची व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने संयुक्तपणे तपासास सुरुवात केली.

वैद्यकीय अहवालानुसार मृत इसमाच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याचे उघड झाल्याने 2 फेब्रुवारी रोजी कोरची पोलिसांनी कलम 103 (1), 238 भान्यासं अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने केवळ घटनास्थळावरील दुवे व गोपनिय बातमीदारांच्या मदतीने क्लिष्ट अशा गुन्ह्राचा तपास करताना या हत्येचा उलगडा झाला. कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथील शानू पठाण याचे मृत इसम जितू कंवर (30 वर्षे), रा.जेठकन्हार, ता.डोंगरगड, जि.राजनांदगाव (छ.ग.) याच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात जितू कंवर हा अडसर ठरत असल्याने सोनाली कंवर (25 वर्ष) रा.जेठकन्हार (ता.डोंगरगड) हिच्या मदतीने कट रचून आरोपी शानू पठाण याने जितू कंवर याला कायमचे संपविण्याचा कट रचला.

जितू हा खुर्शिपार ता.कोरची येथे आलेला असताना शानू याने आपल्या तीन सहकाऱ्यांच्या मदतीने धारदार शस्त्राने त्याच्या मानेवर वार करुन त्याचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह बोगाटोला जवळच्या जंगलात जमिनीत पुरला. पोलिसांनी आरोपी शानू पठाण (36 वर्षे), पुंकेश बोरकर (32 वर्षे), चंद्रशेखर गुज्जेवार (27 वर्षे), धनपाल मडावी (21 वर्षे), सर्व रा.जांभुळखेडा, आणि 5) सोनाली कंवर, रा.जेठकन्हार यांना बुधवारी (दि.4) अटक केली. सर्व आरोपींना न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो.निरीक्षक शैलेंद्र ठाकरे हे करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, प्रभारी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कार्तिक मधीरा, उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात स्थागुशा गडचिरोलीचे पोनि. अरुण फेगडे, कोरचीचे पोनि.शैलेंद्र ठाकरे, सहायक पो.निरीक्षक मुकुंद देशमुख, उपनिरीक्षक विकास चव्हाण आणि पोलीस अंमलदारांनी पार पाडली.