आलापल्लीजवळच्या जंगलात इसमाची रहस्यमय निर्घृण हत्या

पोलीस मारेकऱ्याच्या मागावर

घटनास्थळी पंचनामा करताना अहेरी पोलीस

आलापल्ली : आलापल्ली ते सिरोंचा मार्गावर 5 किलोमीटर अंतरावरील नागमंदिराजवळच्या जंगलात एका इसमाची निर्घृण हत्या होण्याच्या घटनेने आलापल्ली परिसरात खळबळ उडाली आहे. रविंद्र तंगडपल्लीवार (49 वर्ष, रा.नागेपल्ली) असे मृत इसमाचे नाव आहे. ते बँकेसाठी आर.डी. कलेक्शनचे काम करत होते. या हत्येचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवली आहेत. त्यामुळे लवकरच आरोपीचा शोध लागून या हत्येमागील कारण समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, तंगडपल्लीवार हे रविवारी दुपारी नेहमीप्रमाणे दैनंदिन कामासाठी म्हणून घराबाहेर पडले. पण काही वेळानंतर त्यांचा संपर्क तुटला. मोबाईल बंद दाखवत होता. घरच्या लोकांसह मित्रमंडळीने संध्याकाळपर्यंत त्यांचा शोध घेतल्यानंतर पोलिसांना सूचना दिली. कशीबशी रात्र काढल्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा शोध सुरू झाला. तेव्हा आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावरील नाग मंदिराजवळच्या जंगलात महामार्गापासून 200 मीटर आत तंगडपल्लीवार यांचा मृतदेह सापडला.

क्रुरपणे घाव घालत केली हत्या

तंगडपल्लीवार यांची हत्या अत्यंत क्रुरपणे करण्यात आली. त्यांच्या एका हाताचे बोट कापलेले होते. चेहरासुद्धा विद्रुप केलेला होता. विशेष म्हणजे मृतदेहाजवळ दोन ग्लास आणि दारूची छोटी बाटली आढळली. त्यावरून नियोजनबद्ध पद्धतीने आणि मनातील राग व्यक्त करत कोणीतरी ओळखीच्याच व्यक्तीने ही हत्या केल्याचे स्पष्ट होत आहे. रविद्र तंगडपल्लीवार यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

कोणताही पुरावा सोडला नाही

श्वानपथकाला आरोपीच्या घटनास्थळी राहिलेल्या एखाद्या वस्तूच्या आधारे आरोपीचा माग काढणे शक्य झाले असते. पण ही हत्या करताना आरोपीने घटनास्थळी कोणताही पुरावा सोडला नाही. त्यामुळे पोलिसांचे श्वान तिथेच घुटमळले. अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे, पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांनी घटनास्थळी भेट दिली.