दारूच्या नशेत गळा आवळून पत्नीचा खून, पती गजाआड

चारित्र्याच्या संशयातून होता वाद

गडचिरोली : लग्नाला 10 वर्षे झालीत, दोन मुलेही झाली, पण पत्नीच्या चारित्र्याबद्दल त्याच्या मनात असलेला संशय दूर होत नव्हता. अखेर त्याने दारूच्या नशेत आपल्या संतापाला वाट देत तिचा गळा आवळला आणि मनातील संशयाचे भूत कायमचे उतरविले. पण यामुळे त्या दाम्पत्याची दोन छोटी मुले पोरकी झाली.

हा सर्व प्रकार कोरची तालुक्यातील सोनपूर या गावी घडला. टामिनबाई पुरूषोत्तम कचलाम (34 वर्ष) असे मृत पत्नीचे नाव, तर पुरूषोत्तम गजराज कचलाम (34 वर्ष) असे आरोपी पतीचे नाव आहे. कोरची पोलिसांनी शुक्रवारी (दि.5) आरोपी पुरूषोत्तमला अटक केली.

झाले असे की, पुरूषोत्तम आणि पत्नी टामिनबाई यांच्यात चारित्र्याच्या संशयातून नेहमीच खटके उडत होते. गेल्या 31 आॅगस्ट रोजी त्यांच्यात असाच वाद झाला. त्यामुळे 1 सप्टेंबर रोजी पुरूषोत्तम पत्नीला तिच्या माहेरी (चौकी, जि.मानपूर मोहल्ला, छत्तीसगड) सोडण्यासाठी पायी निघाले होते. सोनपूर ते गोटगुलदरम्यानच्या कामेली जंगलात त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. यावेळी पुरूषोत्तमने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह तिथेच सोडून तो गावात परतला. दारूच्या नशेत आपण पत्नीचा खून केला, अशी कबुलीही त्याने पोलिसांकडे दिली. पुढील तपास एसडीपीओ रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोटगुलचे प्रभारी अधिकारी कृष्णा सोळंके करीत आहे.

मृत महिलेच्या आईने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पुढील कारवाई केली. या दाम्पत्याला 9 आणि 5 वर्षाची दोन मुले आहेत. आई कायमची हिरावल्या गेली, वडील कारागृहात अशा स्थितीत त्या मुलांचे हाल होण्याची शक्यता आहे.