
गडचिरोली : एरवी शांत राहणाऱ्या आणि हत्येसारखा गंभीर गुन्हा क्वचितच घडणाऱ्या गडचिरोली शहराचा लांझेडा परिसर सोमवारी संध्याकाळी एका युवकाच्या हत्येने हादरून गेला. 5 वर्षांपूर्वी फर्निचर बनविण्यासाठी पैसे दिले असताना फर्निचरही दिले नाही आणि पैसेही परत केले नाही याचा जाब विचारण्यासाठी सचिन कोल्लुरवार हा युवक आपल्या एका मित्रासोबत लांझेडातील महेश बुरांडे याच्याकडे गेला होता. पण पैसे परत मिळण्याऐवजी सचिनला जीव गमवावा लागला.
पाच वर्षांपूर्वीचा व्यवहार
अचानक घडलेल्या या हत्येची हकिकत अशी की, सचिन रामचंद्र कोल्लुरवार (33 वर्ष) रा.विवेकानंद नगर, गडचिरोली हा पानठेला चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याला पत्नी, एक मुलगी आणि आई-वडील असा परिवार आहे. कोरोनाकाळात गडचिरोलीत कार्यरत पुणे येथील पोलीस अधिकाऱ्याने सागवानाचे फर्निचर बनवून देण्यासाठी लांझेडा येथील फर्निचर व्यावसायिक महेश महादेव बुरांडे (35 वर्ष) याला 2 लाख रुपये दिले होते. तसेच सचिन कोल्लुरवार यानेही आपल्या घराच्या फर्निचर कामासाठी त्याला 10 हजार रुपये दिले होते. मात्र बुरांडे याने 2020 पासून फर्निचर तर बनवून दिले नाहीच आणि पैसेही परत केले नाही.
तंबी देणेच पडले महाग
दरम्यान आठवड्यापूर्वी सचिनने त्या पोलीस अधिकाऱ्याच्या वतीने महेशकडे जाऊन त्याला फर्निचर बनवून देण्याची तंबी दिली होती. त्यानंतर काल सोमवारी (दि.16) सचिन कोल्लुरवार आणि त्याचा मित्र दीपक नंदेश्वर हे दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास महेश बुरांडे याच्याकडे गेले. फर्निचर तयार नसल्यामुळे सचिन आपल्यावर चिडलेला असल्याने तो आपल्याला मारू शकतो या भितीने महेश बुरांडे याने घराचे दार बंद करून आत लपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रागात असलेल्या सचिनने दारावर जोरदार ठोसा मारला. त्यामुळे दाराच्या सनमायकाला छिद्र पडले. सचिन आता काहीही करून आपल्याला गाठणार या भितीने महेश बुरांडे याने घरातून मिरची पावडर घेतले आणि बाहेर येत सचिन आणि त्याचा मित्र दीपक यांच्या डोळ्यात फेकले. यावेळी दीपक नंदेश्वर याने स्वत:ला वाचवत तेथून पळ काढला. पण डोळ्यात मिरची पावडर गेल्याने सचिन हतबल झाल्याचे दिसताच महेश बुरांडे याने लाकडाला छिद्र पाडायचा किकरा (धारदार शस्र) उचलून थेट सचिन कोल्लुरवार याच्या छातीत डाव्या बाजुने खुपसला.
खोलवर घाव झाल्याने सचिन तिथेच कोसळला आणि रक्तप्रवाह होऊन काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी महेश बुरांडे याने तेथून पळ काढला. पाहता-पाहता घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. प्रत्यक्षदर्शींचे बयान आणि तक्रारीच्या आधारावर गडचिरोली पोलिसांनी आरोपी महेश बुरांडे याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.
फॅारेन्सिक तज्ज्ञांकडून तपासणी
या घटनेनंतर पोलिसांनी फॅारेन्सिक तज्ज्ञांच्या चमुला पाचारण केले. नागपूरवरून या चमुने गडचिरोली गाठून रात्रीच घटनास्थळावरून रक्त नमुने, मिरची पावडरचे नमुने, ठोसा मारल्याने छिद्र पडलेल्या दाराचे अवशेष अशा अनेक बारीकसारिक बाबी जप्त केल्या. त्यानंतर ही चमू नागपूरकडे रवाना झाली. हा घटनाक्रम पाहता हा पूर्वनियोजित कट रचून केलेली हत्या नसल्याचे दिसून येते. आरोपीने घाबरलेल्या अवस्थेत आपल्यावरील संकट दूर करण्यासाठी सचिन कोल्लुरवारवर हल्ला केल्याचे वरकरणी दिसत आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस करीत आहेत.































