मारेकऱ्यांनी झोपेतच केला लखनचा गेम, घरातील मुलांनाही कळले नाही

धक्कादायक तथ्य बाहेर येण्याची शक्यता

गडचिरोली : छोटेखानी किराणा दुकान चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या, कोणाशीही शत्रुत्व नसणाऱ्या लखन सुन्हेर सोनार (38) या इसमाची त्याच्याच घरात शिरून चाकूने हल्ला करून हत्या झाली. या घटनेने कोरची तालुक्यातील दवंडी हे गाव हादरून गेले आहे. लखनची हत्या कोण करू शकतो याबाबत गावात तर्कवितर्क लावले जात आहेत. तक्रारीत नमूद घटनाक्रमाचीही सत्यता पोलिसांकडून पडताळून पाहिली जात आहे. त्यामुळे या हत्येत धक्कादायक तथ्य बाहेर येण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.

बुधवारच्या रात्री 11 वाजता झालेल्या या घटनेच्या वेळी मृत लखन, पत्नी सरिता आणि त्यांची दोन मुले (16 वर्षीय मुलगी आणि 12 वर्षीय मुलगा) हे सर्वजण घरात झोपलेले होते. अज्ञात मारेकऱ्याने दार ठोठावल्यानंतर सरिताने दार उघडले. त्यावेळी काळे कपडे घातलेले आणि चेहरा झाकलेले पाच ते सहा जण घरात शिरले आणि सरिताला चाकूचा धाक दाखवून झोपलेल्या लखनचा गळा चिरला. एवढेच नाही तर त्याच्या अंगावरही चाकुने वार केले, असा घटनाक्रम सरिताने पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केला आहे. मारेकरी निघून गेल्यानंतर सरिताने शेजाऱ्यांना बोलवून घडलेली घटना सांगितली. तोपर्यंत घरात झोपलेल्या मुलांनाही या घटनेचा सुगावा लागला नाही हे विशेष.

घरात एकच मोबाईल

या कुटुंबाकडे एकच मोबाईल आहे. तो मोबाईल लखन याच्याकडे राहात होता. मुले बेडगाव येथील शाळेत शिकायला जातात. त्यामुळे लखनच्या मोबाईलवरून कोणाकोणाशी संभाषण झाले होते त्यावरून पोलिसांना मारेकऱ्यांपर्यंत पोहोचणे शक्य होऊ शकते. त्यासाठी त्या मोबाईलचा सीडीआर मागविण्यात आला आहे. शुक्रवारी मृत्यूपश्चात धार्मिक विधी असल्यामुळे पोलिसांना लखनची पत्नी सरिता हिचे सविस्तर बयान घेणे शक्य झाले नाही. पण एकूणच परिस्थिती पाहता लखनचा काटा कोणी काढला, कशासाठी काढला हे शोधण्याचे आव्हान बेडगाव पोलिसांपुढे येऊन ठेपले आहे.