भामरागड दलमच्या नक्षलवाद्याचे जिल्हा पोलिस व सीआरपीएफसमोर आत्मसमर्पण

12 वर्षांपासून जुळला होता दलमसोबत

गडचिरोली : भामरागड दलममध्ये सक्रिय असलेल्या लच्चु करिया ताडो (45 वर्ष) या नक्षलवाद्याने बुधवारी सीआरपीएफ आणि गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. 2012 पासून तो नक्षलवाद्यांशी जुळलेला होता. पोलिसांबद्दलची माहिती नक्षलवाद्यांना पोहोचवून त्यांना मदत करणे आणि नक्षलवाद्यांची पत्रकं आणि त्यांचा संदेश गावातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम तो करत होता. विविध गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असून त्याच्यावर दोन लाखांचे इनाम होते. लच्चु हा मूळचा भामरागड तालुक्यातील भटपार या गावचा रहिवासी आहे.

सन 2012-13 पासून गावात राहुन जनमिलिशिया म्हणून माओवाद्यांसाठी रेशन आणून देणे, पहारेकरी म्हणून काम करणे, नक्षलवाद्यांची शस्रे सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवणे, निरपराध इसमांचे खून करण्याआधी रेकी करुन त्याची माहिती नक्षलवाद्यांना पुरविणे, पोलीस दलाबद्दलची माहिती नक्षलवाद्यांना देणे तसेच नक्षल पत्रके जनतेपर्यत पोहोचविणे अशी कामे तो करीत होता.

सन 2022 मध्ये मौजा ईरपनार गावातील रस्ता बांधकामावरील 19 वाहनांच्या जाळपोळीत त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. सन 2023 मध्ये मौजा नेलगुंडा जंगल परिसरातील पायवाट रस्त्यातील जमिनीत स्फोटके पुरुन ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.