गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या बांधकामावरील वाहनांची जाळपोळ करत दहशत पसरविली आहे. अतिदुर्गम अशा हिदूर गावाजवळ नक्षलवाद्यांनी एका जेसीबीसह दोन ट्रॅक्टर जाळले. त्यानंतर एक टँकरही जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी घटनास्थळी टाकलेल्या पत्रकात २२ डिसेंबरला भारत बंद पाळण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे भामरागडसह एटापल्ली, धानोरा तालुक्याच्या छत्तीसगड सीमावर्ती भागात दहशतीचे वातावरण पसरून अनेक कामांवर परिणाम झाला आहे. दुसरीकडे पोलिस विभागही सतर्क झाला आहे. नक्षली सावटामुळे कोणतेही सरकारी काम थांबवणार नाही. त्यांना पोलिस संरक्षण देऊन ती कामे पूर्ण करू, अशी भूमिका पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्पष्ट केली.
हिदूर-दोबुर ते पोयरकोटी या रस्त्याचे बांधकाम काही दिवसांपासून सुरू आहे. त्या कामासाठी हिदूर गावाजवळ ठेवलेली कंत्राटदाराची वाहने नक्षलवाद्यांनी जाळून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे २ ते ८ डिसेंबरदरम्यान झालेल्या नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहादरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी तीन युवकांची हत्या नक्षलवाद्यांकडून करण्यात आली होती. नक्षली कारवायांमध्ये झालेली ही वाढ छत्तीसगड सीमावर्ती भागात दहशत पसरविण्यास कारणीभूत ठरत आहे.
कोणतेही काम थांबणार नाही- नीलोत्पल
आतापर्यंत ज्या भागात कोणतीही कामे होत नव्हते, त्या भागात जाऊन रस्ते, पूल, मोबाईल टॅावर यासारखी कामे पोलिसांच्या पुढाकाराने केली जात आहेत. त्यामुळे नक्षलवाद्यांना आपले अस्तित्व राहते की नाही अशी भिती वाटत आहे. त्यातूनच दहशत निर्माम करण्यासाठी आणि कामे बंद पाडण्यासाठी नक्षली कारवाया अलिकडे वाढल्याचे दिसून येते. परंतू नक्षली दहशतीला भिक घालत आम्ही विकासाचे कोणतेही काम बंद पडू देणार नाही. त्यांना पोलिस संरक्षणात पूर्ण करू, असा विश्वास पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी ‘कटाक्ष’सोबत बोलताना व्यक्त केला. दरम्यान नक्षलवाद्यांनी पुकारलेला बंद यशस्वी होऊ न देता सर्व व्यवहार सुरळीत सुरू राहावे यासाठीही पोलिस यंत्रणा प्रयत्न करत आहे.