अहेरी, आरमोरी, कोरची, चामोर्शीत प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांची खांदेपालट

नवीन ठाणेदारांकडे येणार कारभार

गडचिरोली : अवघ्या काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील काही महत्वाच्या ठाण्यांचे प्रभारी अधिकारी (ठाणेदार) म्हणून रुजू झालेल्या पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नवीन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात अहेरी, आरमोरी, कोरची आणि चामोर्शीचा समावेश आहे.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी याबाबतचे आदेश जारी केले. त्यानुसार आरमोरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद रहांगडाले यांची नक्षल सेलमध्ये बदली करत त्यांच्या जागी अपर अधीक्षक कार्यालयातील वाचक कक्षाचे प्रभारी कैलास गवते यांची नियुक्ती करण्यात आली. अहेरीचे निरीक्षक दशरथ वाघमोडे यांची अपर अधीक्षक कार्यालयात वाचक कक्षाचे प्रभारी म्हणून बदली केली. त्यांच्या जागी गडचिरोली कोर्टात पैरवी अधिकारी असलेले पो.निरीक्षक स्वप्निल इज्जपवार यांची नियुक्ती झाली. कोरची ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत वाबळे यांची कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून तर चामोर्शीचे पो.नि. विश्वास पुल्लरवार यांची युएपीए सेलमध्ये बदली करण्यात आली. याशिवाय अहेरी ठाण्याचे परीविक्षाधीन उपनिरीक्षक रोहन जावळे यांची जारावंडी ठाण्यात बदली करण्यात आली. गॅरापत्ती पोलीस मदत केंद्राचे पो.उपनिरीक्षक सचिन तोटेवाड यांना विशेष अभियान पथकात पाठविण्यात आले, तर उपनिरिक्षक ज्ञानेश्वर देवतळे यांना विशेष अभियान पथकातून गॅरापत्ती पोलीस मदत केंद्रात पाठविण्यात आले.

रिक्त झालेल्या चामोर्शी आणि कोरची येथील नवीन ठाणेदारांच्या नियुक्त्या बाकी आहेत. त्या ठिकाणी कोणाची वर्णी लागते याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे.