कंत्राटदाराला 1.70 लाखांची लाच मागणारा कनिष्ठ अभियंता जाळ्यात

धानोरा येथे एसीबीची कारवाई

गडचिरोली : धानोरा येथील जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभाग कार्यालयात कनिष्ठ अभियंता असलेल्या अक्षय मनोहर अगळे (29 वर्ष) याला 1 लाख 70 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) ताब्यात घेतले. ही कारवाई गुरूवारी संध्याकाळी करण्यात आली.

मौजा-बोधनखेडा पोचमार्ग, तुमडीकसा-हिरंगे, रेंगगाव-गोटाटोला, मुरूमगाव-रिडवाही येथील सुधारणा केलेल्या कामाचे एमबी देण्याकरीता संबंधित कंत्राटदाराला अभियंता अगळे याने 1 लाख 70 हजार रुपयांची मागणी केली. दि. 19 जून आणि 27 जून 2024 रोजी कंत्राटदाराला लाच मागण्यात आली. पण लाच द्यायची नसल्याने कंत्राटदाराने गडचिरोलीत एसीबीकडे तक्रार केली. त्यामुळे एसीबीने पंच साक्षीदारांसमक्ष या मागणीची पडताळणी केली.

पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले व चमुने या तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले. त्यामध्ये पडताळणीदरम्यान तक्रारदार असलेल्या कंत्राटदाराला केलेल्या कामाची एम.बी. देण्यासाठी पंचासमक्ष सुस्पष्ट मागणी केल्याने धानोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. एवढेच नाही तर आरोपी अक्षय अगळे याच्या घराची एसीबीच्या चमुकडून झडती घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर (नागपूर), अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम, अ.पो.अधीक्षक संजय पुरंदरे (नागपूर) यांच्या मार्गदर्शनात व उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या पर्यवेक्षणात पो.निरीक्षक श्रीधर भोसले, पोहवा राजेश पदमगिरीवार, अंमलदार संदीप उडान, संदीप घोरमोडे, प्रवीण जुमनाके व चालक हवालदार प्रफुल डोर्लीकर यांनी केली.

कोणत्याही शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ अॅन्टी करप्शन ब्युरो, गडचिरोली यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांनी केले आहे.