कंत्राटी आरोग्य सेविकेला ‘ती’ मागणी करणाऱ्या डॅाक्टरवर गुन्हा

आरोग्य सेविकेची प्रकृती स्थिर

गडचिरोली : वेतनवाढ देण्याचे आमिष दाखवून एका कंत्राटी आरोग्य सेविकेला दोन वर्षांपासून शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यावर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गडचिरोलीत हा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो मुलचेरा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

मुलचेरा येथील एका कंत्राटी आरोग्य सेविकेने 6 डिसेंबर रोजी त्यांच्या राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. प्राथमिक उपचारानंतर त्या आरोग्य सेविकेला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॅा.विनोद म्हशाखेत्री यांच्याकडून केल्या जात असलेल्या मागणीमुळे त्यांच्यावर मानसिक दडपण आले आणि त्यातूनच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आरोग्य सेविकेच्या पतीने केला होता. तब्बल दोन वर्षांपासून डॅा.म्हशाखेत्री यांच्याकडून अशा पद्धतीने त्रास दिला जात होता, अशी तक्रार आरोग्य विभागाकडे आणि जि.प.प्रशासनाकडे करण्यात आली.

प्रकरणाचे गांभिर्य ओळखून मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.सुहास गाडे यांनीही रुग्णालयाला भेट देऊन माहिती जाणून घेतली. त्यानंतर आज गडचिरोली पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम 75 (2), (78) (2) अन्वये डॅा.विनोद म्हशाखेत्री यांच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास मुलचेरा पोलीस करणार आहेत.