कोरची नगर पंचायतीला दोन नगरसेवकांनी ठोकले कुलूप

पाच जणांवर गुन्हे दाखल

कोरची : कोरची नगर पंचायतमध्ये कामकाज ढेपाळल्याचा आरोप करत भाजपच्या दोन नगरसेवकांनी आणि तीन नागरिकांनी नगर पंचायत कार्यालयाला चक्क कुलूप ठोकले. त्यामुळे त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या दिवशी (बुधवारी) त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

शैलेंद्र बिसेन आणि निरा बगवा अशी गुन्हा दाखल झालेल्या दोन नगरसेवकांची नावे आहेत. याशिवाय नंदू वैरागडे, शालिकराम कराळे आणि पूर्वाश्रमीचे माओवादी (आत्मसमर्पित) निरिंगसाय मडावी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच या आंदोलनासाठी जमलेल्या इतर काही नागरिकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. नगरसेविका निरा बगवा यांना आधीच घरी पाठवण्यात आले, मात्र इतर चौघांना बुधवारी जामीन देण्यात आला.

कुलूप पावणाऱ्यांनी शहरातील विविध समस्यांकडे न.पं.प्रशासनाचे लक्ष वेधत कारभारात सुधारणा करण्याची मागणी केली होती. त्यात प्रामुख्याने वीज, स्वच्छता, पात्र लाभार्थ्यांना घरकुल, तसेच निधीचा विनियोग योग्य प्रकारे न लावला अनेक कामात गडबड होत असल्याचा आरोप केला होता. नगर पंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार गणेश सोनवाणे यांचे कारभारात लक्ष नसल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणने होते. त्यामुळे दोन नगरसेवकांसह काही नागरिकांनी अखेर मंगळवारी दुपारी नगर पंचायत कार्यालयाला कुलूप ठोकत प्रशासनाचा निषेध केला. यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पाच जणांसह इतर नागरिकांवर गु्न्हा दाखल करण्यात आला.

विशेष म्हणजे त्यांची जमानत घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे उपलब्ध नसल्याने चारही जणांना पोलीस ठाण्यातून जाणे अशक्य झाले होते. सकाळी नगर पंचायत प्रशासनाच्या विनंतीनुसार पोलिसांनी नगर पंचायतचे कुलूप तोडण्यास मदत केली. त्यानंतर कामकाज सुरू झाले. घर टॅक्स पावतीसारख्या काही कागदपत्रांची पुर्तता झाल्यानंतर गुन्हा दाखल झालेल्या चौघांचीही सुटका करण्यात आली.