अहेरी : वांगेपल्ली येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या निवासी शाळेतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याने मोबाईल चोरीच्या संशयातून काही विद्यार्थ्यांना छडीने मारल्याचा प्रकार समोर आल्यानंतर एका पालकाने थेट पोलीस तक्रार केली. अहेरी पोलिसांनी अजय रमेश चंद्रगिरीवार या कर्मचाऱ्याविरूद्ध मुलांची काळजी व संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींना प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने प्रत्येक तालुक्यात एक अशी शासकीय निवासी शाळा सुरू केली आहे. अहेरी तालुका मुख्यालयापासून जवळच असलेल्या वांगेपल्ली येथे सुद्धा अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची निवासी शाळा चालवली जाते. 2011 पासून सुरू असलेल्या या शाळेत वर्ग 5 ते 10 पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात.
शनिवारी विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आलेल्या पालकांना सफाई कामगार अजय चंद्रगिरीवार याने अमानुष मारहाण केल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या घटनेमुळे विद्यार्थी धास्तावलेले होते. शाळेचे मुख्याध्यापकही उपस्थित नव्हते. शनिवारी शाळा अर्धाच दिवस असली तरीही वसतिगृह असल्याने येथे अधीक्षक, अधीक्षिका, पहारेकरी, शिपाई आदी कर्मचारी उपस्थित राहणे आवश्यक आहे. मात्र कर्मचारी हजर नसल्याचे पालकांनी सांगितले. त्यामुळे संतप्त पालक जीवन उर्फ जिब्बा जयसुख तलांडे यांनी अहेरी पोलिसात तक्रार दाखल केली. अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक निकिता खडेकर करत आहे.
































