माजी जि.प.अध्यक्ष कंकडलावार यांच्यावर अहेरीत गुन्हा दाखल

विनापरवाना बांधकाम प्रकरण

अहेरी : वारंवार नोटीस बजावूनही बांधकामासंदर्भात आवश्यक प्रमाणपत्रे सादर केली नसल्याने नगर पंचायतच्या तक्रारीवरून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलावार यांच्यावर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

अहेरी नगर पंचायतचे मुख्याधिकारी गणेश शहाणे यांनी नगर रचना सहाय्यक जितेंद्र सहारे यांच्यामार्फत पोलीस स्टेशनला यासंदर्भात तक्रार दिली. त्यात अहेरी नगरपंचायत क्षेत्रातील सर्वे क्र. 51/2 च्या खुल्या जागेवर अजय कंकडलावार यांनी बांधकाम करत असताना आवश्यक परवानग्यांचे प्रमाणपत्र सादर केले नाही. विभागीय निर्देशानुसार त्याबाबत वारंवार नोटीस देऊन बांधकाम थांबवण्याबाबत आणि आवश्यक त्या कागदपत्रांच्या आधारे परवानगी घेण्याबाबत सूचना दिली होती. तरीही त्यांनी बांधकाम सुरू ठेवले आहे. सीमांत अंतर सोडले नाही व अग्निशमन सुरक्षा नाहरकत प्रमाणपत्र व संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र हे दस्तावेज नगर पंचायतकडे सादर केले नाही.

त्यामुळे एमआरटीपी अॅक्ट 1966 चे कलम 52, 53, 54 अंतर्गत अजय कंकडलावार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अहेरीचे पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांनी सांगितले.