विद्यार्थिनींशी गैरव्यवहार केल्याचा ठपका, दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल

शिक्षकांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न?

गडचिरोली : अहेरी तालुक्यातल्या कमलापूर येथील श्रीगुरूदेव प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील दोन विद्यार्थिनींसोबत तेथील दोन शिक्षकांनी गैरव्यवहार केल्याची तक्रार मंगळवारी (दि.8) केल्यानंतर रेपनपल्ली पोलिसांनी संबंधित शिक्षकांविरूद्ध रात्री पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. दरम्यान त्या शिक्षकांपैकी एका शिक्षकाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल करत आपण कोणत्याही मुलीशी गैरव्यवहार केला नसताना गावातल्या दोन इसमांनी आपल्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. पण मी दाद दिली नसल्यामुळे संबंधित मुलीच्या पालकांना तक्रार देण्यासाठी उसकावले, असा आरोप केला. त्या दोन इसमांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी आपल्या तक्रारीत केली.

श्याम पांडुरंग धाईत (माध्यमिक शिक्षक) आणि दिलीप भिवाजी राऊत (प्राथमिक शिक्षक) अशी गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकांची नावे आहेत. त्यापैकी श्याम धाईत यांनी या प्रकरणात आपला दोष नसताना आपल्याला कसे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला हे पत्रकार परिषदेत सांगितले. कमलापूर येथील सदर शाळेत ते गेल्या 25 वर्षांपासून कार्यरत आहेत. 21 मार्च 2025 रोजी आठवीचा वर्ग घेत असताना शिक्षक धाईत यांच्या टेबलसमोर बसलेल्या एका विद्यार्थिनीच्या पायाला त्यांचा पाय लागला. वास्तविक अनावधानाने घडलेल्या त्या घटनेत आपला कोणताही वाईट हेतू नसताना ताटीकोंडावार आणि गावडे नामक दोन इसम या घटनेवरून आपल्याला ब्लॅकमेल करून 15 लाख रुपयांची मागणी करत होते. पण आपण दाद दिली नसल्यामुळे त्यांनी मुलीच्या वडीलांना तक्रार देण्यासाठी प्रवृत्त केले, असे शिक्षक धाईत यांनी पत्रकारांना सांगितले.

दुसरे शिक्षक राऊत हे मुलीच्या पाठीवर थापड मारतात, यातून मुलीचा विनयभंग होत असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. राऊत यांनाही अशाच पद्धतीने त्या दोन इसमांनी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे शिक्षक धाईत यांनी सांगितले. दरम्यान मुलींच्या तक्रारीवरून रेपनपल्ली पोलिसांनी दोन्ही शिक्षकांविरूद्ध गुन्हा दाखल केला.

कृत्य अंगलट येणार म्हणून लावले आरोप- ताटीकोंडावार

याप्रकरणी संतोष ताटीकोंडावार यांनी पाठविलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, या प्रकरणात मी कोणालाही आपल्या घरी बोलवले नाही. शिक्षक धाईत हे माझ्या घरी आले होते आणि काहीही करू नका अशी विनंती करत होते. त्यावर मी प्रत्यक्ष मुली आणि त्यांच्या पालकांना भेटून माहिती जाणून घेतल्याशिवाय काहीही बोलणार नाही, असे सांगितले. त्यांनी केलेले कृत्य अंगलट येणार म्हणून आपल्यावर खंडणीचा आरोप त्यांनी लावला असल्याचे ताटीकोंडावार यांचे म्हणने आहे.