देसाईगंजमध्ये चालत्या वाहनात चालत होता आयपीएलवरील ऑनलाईन सट्टा

रोख ३.६६ लाखांसह वाहनही जप्त

देसाईगंज : आयपीएलवर अहेरी येथील एका हॅाटेलमध्ये चालणारा आयपीएलवरील सट्टा उघडकीस आल्यानंतर आता देसाईगंजमध्ये चालत्या वाहनातून चालणारा ऑनलाईन सट्टा उघडकीस आणण्यात देसाईगंज पोलिसांना यश आले. दि.1 मे रोजी ही कारवाई करण्यात आली. मात्र तिसऱ्या दिवशी याबाबतची माहिती पोलिसांकडून उघड करण्यात आली.

देसाईगंज पोलिसांच्या हद्दीत आयपीएलवर सट्टा खेळवल्या जात असल्याची खात्रीशिर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनात पो.उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर, अंमलदार विलेश ढोके, संतोष सराटे व विलास बालमवार यांनी देसाईगंज शहरातील विर्शी टी- पाँईट चौकात सापळा रचुन नाकाबंदी केली. यात टोयोटा कंपनीच्या हायराईडर चारचाकी वाहनात (क्रमांक एमएच 33, एसी 5443) मोबाईलच्या माध्यमातून सट्टा खेळला जात असल्याचे दिसून आले. या वाहनात रोख 3 लाख 66 हजार 900 रुपयेही आढळले. सर्च इंजिनच्या सहाय्याने वेबसाईटचा वापर करुन युजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने आयपीएलवर सट्टा खेळत असल्याची कबुली त्यातील चेतन पुरूपोत्तम मस्के रा.कोरेगांव या आरोपीने दिली. त्याला चंद्रपूर जिल्ह्यातील शेगाव (ता.वरोरा) येथील नविश नरळ हा आरोपी मदत करत होता. त्याच्याही विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात रोख रक्कम, वाहन आणि मोबाईल असा एकूण 16 लाख 31 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, उपविभागीय पोलिस अधिकारी (कुरखेडा) रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात, पोलिस निरीक्षक अजय जगताप, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर हे पुढील तपास करीत आहेत.