देसाईगंज : तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष देत लैंगिक शोषण करणाऱ्या आणि अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार लैंगिक छळ करणाऱ्या दोघांना देसाईगंज पोलिसांनी अटक केली. त्यात सराफा व्यावसायिक सुनील बोके (48 वर्ष) आणि त्याला सहकार्य करणाऱ्या अक्षय कुंदनवार (32 वर्ष) यांचा समावेश आहे. त्यांच्या पीसीआरमध्ये दोन दिवसांची वाढ केली असून आता गुरूवारपर्यंत ते पोलीस कोठडीत राहणार आहेत.
या प्रकरणातील पीडित तरुणी 23 वर्षाची आहे. 17 आॅगस्ट 2024 ते 26 जून 2025 या कालावधीत सुनील बोके याने स्वत:च्या घरी आणि चारचाकी वाहनात त्या तरुणीचे लैंगिक शोषण केले. या कामात आरोपी बोके याचा सहकारी अक्षय कुंदनवार याने त्याला सहकार्य करत तरुणीला बोके याची भेट घेण्यासाठी प्रवृत्त केले. पण आरोपींचा छळ असह्य झाल्याने अखेर तिने पोलिसांकडे धाव घेतली. तिने तक्रार करून नये यासाठीही तिच्यावर दबाव आणण्यात आला, मात्र पोलिसांनी हिंमत देत तक्रार नोंदवून घेतली.
दोन्ही आरोपींना आधी 19 आॅगस्टपर्यंत पीसीआर दिला होता, मात्र मंगळवारी न्यायालयाने त्यांचा पीसीआर आणखी दोन दिवसांनी वाढवून दिला, असे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी सांगितले.