ठाणेदार बदलताच कोंबड बाजार सुरू? पोलिसांची धाड, 21 आरोपींना अटक

15 लाख 93 हजारांचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली : मुलचेरा पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या चिचेला ते आपापल्ली मार्गावरच्या जंगलात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर नव्याने रुजू झालेल्या ठाणेदारांनी धाड टाकून तब्बल 15 लाख 93 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत 21 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुलचेरा ठाण्याचे प्रभारी अधिकारी अशोक भापकर यांची गडचिरोलीत बदली होऊन पोलीस निरीक्षक महेश विधाते यांनी प्रभार घेतला. त्यामुळे ठाणेदार बदलताच कोंबड बाजारावरील जुगार पुन्हा सुरू झाला होता.

या जुगाराची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विधाते यांनी आपल्या पथकासह दुपारच्या सुमारास चिचेला ते आपापल्ली मार्गावरच्या जंगलात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर धाड टाकली. त्या ठिकाणावरून 30 मोटारसायकली, 13 मोबाईल फोन, रोख 14 हजार 750 रुपये, 5 नग जिवंत कोंबडे, लोखंडी धारदार तात्या 20 नग, एक मोजमाप काटा असा एकूण 15 लाख 93 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे जुगार खेळण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये मुलचेराच नाही तर अहेरी, भामरागड आणि चामोर्शी तालुक्यातील नागरिकांचाही समावेश आहे. पण या कारवाईत जप्त केलेली रोख रक्कम केवळ 14 हजार 750 रुपये दाखविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवाय कोंबड्यांची संख्याही कमी दाखविल्याची चर्चा आहे.

अटक केलेल्या आरोपींमध्ये भाऊजी शिवराम वाघमारे रा.सिंगनपेठ ता.अहेरी, सागर प्रकाश वाकुडकर रा.चांदेश्वर ता.चामोर्शी, ईश्वर नानाजी सडमेक रा.गोमणी ता.मुलचेरा, राजेंद्र व्यंकया तानसेन रा.येचली ता.भामरागड, आदर्श निलेश खोबरे रा.वेलगुर ता.अहेरी, राकेश भिमा आलाम रा.दिना चेरपली ता.अहेरी, प्रसनजित प्रशांतो मंडल रा.भवानीपुर तामुलचेरा, कमलेश सुशांत मंडल रा.भवानीपूर ता.मुलचेरा, सुनील सुधाकर निकेसर रा.कोडीगाव ता.मुलचेरा, संतोष शंकर कोटरंगे रा.नवेगाव ता.अहेरी, मोरेश्वर गिरमाजी तुंकलवार रा.चिचेला ता.मुलचेरा, साईनाथ शंकर कडते रा.कोडीगाव, ता.मुलचेरा, अनिकेत राजु दुर्गे रा.गोमणी ता.मुलचेरा, अशोक भिमराव नैताम रा.आपापली ता.अहेरी, रामकृष्ण सिडाम दास रा.भगतनगर ता.मुलचेरा, परितोष ब्रोजेन बिश्वास रा.खुदीरामपल्ली ता.मुलचेरा, रघुनाथ दशरथ नैताम रा.बंदुकपल्ली ता.मुलचेरा, बुधाजी गंगाराम येरमे रा.चिचेला ता.मुलचेरा, भुजंगराव मुसली मडावी रा.बंदुकपल्ली ता.मुलचेरा, सोमा शिवा आत्राम रा.लगाम ता.अहेरी, गंगाराम रामया डुबले रा.आपापल्ली ता.अहेरी यांचा समावेश आहे.

पोलीस निरीक्षक विधाते यांनी पदभार घेतल्यानंतर दोन आठवड्यातच कोंबड बाजारावर कारवाई करत नवीन ठाणेदार रुजू झाल्याचा संदेश दिला आहे. आता अनधिकृतपणे दारूचा व्यवसाय, करणारे सट्टापट्टीचा जुगार चालविणाऱ्यांवरही अशाच कारवाया होतील का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.