गडचिरोली : गडचिरोली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कुरखेडा उपविभागाअंतर्गत येणाऱ्या कोरची पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील हितकसा या गावात एका व्यक्तीने आपल्या सांदवाडीत अवैधरित्या लावलेली गांजाची झाडे जप्त करण्यात आली. या गांजाची किंमत 15 लाख 19 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी कळविले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला या गांजाच्या शेतीबाबत गोपनिय माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पथकाने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात हितकसा येथील इसम पुनाराम अलिसाय मडावी (45 वर्ष) याच्या घरी धाड टाकली. घराच्या सांदवाडीची पंचासमक्ष झडती घेतली असता, सांदवाडीत अंमली पदार्थाची (गांजाची) लहान-मोठी 160 झाडे लागवड केलेली दिसून आली.
पंचासमक्ष तपासणी केली असता, त्या गर्द हिरव्या रंगाची पाने, फुले, बोंडे असेलेली ओली झाडे व अर्धसुखा गांजा असलेले कॅनबिस वनस्पती (अंमली पदार्थ गांजा) 30.375 कि.ग्रॅ. जप्त करण्यात आली. प्रतिकिलो 50,000 रुपये प्रमाणे त्याची किंमत 15 लाख 18 हजार 750 आणि ईलेक्ट्रीक काटा (किंमत 1000 रु.) असा एकुण 15 लाख 19 हजार 750 रुपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.
आरोपी मडावी याने विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या घराच्या सांदवाडीमध्ये सदर अंमली पदार्थ उगवला असल्याने त्याच्याविरूद्ध गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस) 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस 2 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. अधिक तपास कोरचीचे पो.उपनिरीक्षक मुकुंद देशमुख करीत आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि समाधान दौंड, पोअं/ रोहीत गोंगले, प्रशांत गरफडे, शिवप्रसाद करमे, चालक रामदास ऊईनवार यांनी पार पाडली.
































