Home क्राईम घातपातासाठी पेरून ठेवलेली स्फोटके पोलिसांनी केली जप्त

घातपातासाठी पेरून ठेवलेली स्फोटके पोलिसांनी केली जप्त

गडचिरोली पोलिसांची सतर्कता

गडचिरोली : जिल्ह्यात माओवायांकडून शासनविरोधी घातपाताच्या कारवाया करून सुरक्षा दलांना हाणी पोहोचविण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्यांचा वापर केला जातो. या प्रकारचे साहित्य माओवाद्यांकडून वेगवेगळ्या ठिकाणी जंगल परिसरात जमिनीमध्ये पुरुन ठेवले जाते. त्या साहित्याचा वापर विध्वंसक कारवायांसाठी केला जातो. गडचिरोली पोलीस दलाने अशाच प्रकारचे जंगलात लपवून ठेवलेले स्फोटक साहित्य शोधून ते जप्त केले.

कोरची पोलिस स्टेशनच्या हद्दीतील लेकुरबोडी जंगल परिसरात माओवाद्यांकडून पोलीस पथकाशी घातपात करण्याच्या उद्देशाने एक ते दिड वर्षापूर्वी स्फोटक पदार्थ व साहित्य लपवून ठेवले होते. त्याबाबतची विश्वसनीय माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्फोटकांचा शोध घेण्याची योजना आखण्यात आली. लेकुरबोडी जंगल परिसरात विशेष अभियान पथकाची तीन पथके व बॅाम्ब शोधक नाशक (बीडीडीएस) एक पथक रवाना करण्यात आले.

जंगल परिसरात पायी शोध अभियान राबवित असताना पोलीस पथकास मौजा लेकुरबोडी जंगल परिसरात एक संशयित ठिकाण मिळून आले. त्यावरुन बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून सदर ठिकाणाची तपासणी केली असता, त्याठिकाणी माओवाद्यांकडून लपवून ठेवलेला 5 लिटरचा एक स्टिलचा डबा, 1.25 किलो पांढरे स्फोटक पावडर, 2.50 किलो धार लावलेले लोखंडी सिंलटर, 4 नग क्लेमोर व 8 नग इलेक्ट्रीक वायर बंडल मिळून आले. सुरक्षिततेची योग्य काळजी घेत पोलीस पथकाकडून घटनास्थळावर मिळून आलेले सर्व स्फोटक साहित्य जप्त केले.
गडचिरोली पोलिसांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांनी लपवून ठेवलेले वरीलप्रमाणे मोठे साहित्य जप्त करण्यामध्ये गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (कुरखेडा) रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विअप गडचिरोलीचे पोउपनि.प्रसाद पवार, पोउपनि.निखिल धोबे, बिडीडीएस गडचिरोलीचे पोउपनि.गणेश वलमर-पाटील, सोबतच विशेष अभियान पथक व बीडीडीएस पथकाच्या जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली.