गडचिरोली : गडचिरोली पोलीस उपविभागांतर्गत येणाऱ्या रेगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गरंजीटोल्याच्या कोंबडा बाजारावर पोलिसांनी धाड टाकून तब्बल 92 आरोपींवर गुन्हा दाखल केला. यावेळी त्यांच्याकडून 5 चार चाकी वाहनांसह 46 दुचाकी वाहने, 31 मोबाईल आणि रोख असा सर्व मिळून 44 लाख 26 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र एवढ्या मोठ्या जुगारात केवळ 42 हजार रुपये रोख रक्कम सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, रेगडी हद्दीतील गरंजी टोला जंगल परिसरात सहाय्यक पोलीस अधीक्षक (धानोरा) अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभियान पथकातील तीन पथके माओवादविरोधी अभियान राबवित असताना मौजा गरंजी टोला जंगल परिसरात काही इसमांचा मोठमोठ्याने आरडाओरड करण्याचा आवाज येत होता. पोलीस पथकातील अधिकारी व जवानांनी जवळ जाऊन पाहिले असता, त्या ठिकाणी काही इसम कोंबड्यांची झुंज लाऊन, त्यावर जुगार खेळत असल्याचे दिसून आले. यासंदर्भात वरिष्ठांना माहिती देऊन त्यांच्या परवानगीने रेगडी येथील पोलीस पथकाने योग्य त्या साहित्यानिशी दोन शासकिय पंचांसह तसेच विशेष अभियान पथकातील अधिकारी व अंमलदारांनी संयुक्तपणे धाड टाकली.
या धाडीदरम्यान पोलीस आल्याची चाहूल लागताच जुगार खेळणाऱ्यांनी जंगलाच्या दिशेने पळ काढला. मात्र पोलीसांनी घटनास्थळावरुन 92 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील 46 दुचाकी वाहने, (अंदाजे किंमत 16,10,000 रुपये) 5 चारचाकी वाहने (अंदाजे किंमत 26,00,000 रुपये) 31 मोबाईल फोन (अंदाजे किंमत 1,70,000 रुपये), एकूण 14 नग कोंबडे (किंमत 3,200 रुयये) आणि 5 नग लोखंडी काती, तसेच रोख 42,950 रुपये असा एकूण 44,26,400 रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. एवढ्या मोठ्या जुगारात लाखो रुपये रोख स्वरूपात लावले जात असतील असे वाटत असले तरी प्रत्यक्षात केवळ 42,950 रुपये पोलिसांच्या हाती लागले आहेत.
या कारवाईत 92 आरोपींवर पोस्टे रेगडी येथे अप क्र. 26/2025 कलम 12 (ब) महा. जुगार अधिनियम सहकलम 11 (फ) (न) प्राण्यांना क्रुरतेने वागणूक देण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, 1960 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्राचा पुढील तपास पोस्टे रेगडीचे पोउपनि.कुणाल इंगळे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक (धानोरा) अनिकेत हिरडे व विशेष अभियान पथकाचे सपोनि.विश्वास बागल, पोउपनि.ज्ञानेश्वर धुमाळ, पोउपनि.देवाजी कोवासे व अंमलदार यांनी पार पाडली.