अहेरी : तालुक्यातील इंदारामच्या जंगल परिसरात पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत दारूने भरलेले वाहन जप्त केले. या कारवाईत 3 लाख 44 हजार रुपयांची देशी दारू आणि 4 लाख रुपये किमतीचे बोलेरो वाहन हस्तगत करण्यात आले. मात्र वाहन चालक जंगलाचा फायदा घेऊन पसार झाला.
ही कारवाई दि.31 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास करण्यात आली. पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना सदर दारूने भरलेल्या वाहनाची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील पुलाजवळ संशयित बोलेरो वाहन आढळून आले. पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न करताच चालकाने वाहन जंगलाच्या दिशेने पळवले आणि पसार झाला.
यानंतर पंचासमक्ष वाहनाची तपासणी करण्यात आली असता, रॉकेट संत्रा कंपनीच्या 90 मिली मापाच्या देशी दारूच्या बाटल्यांचे खोके आढळून आले. एकूण 43 खोक्यांमधून 4300 सीलबंद निपा जप्त करण्यात आल्या. प्रत्येक निपची अवैध विक्री किंमत 80 रुपये आहे.
या कारवाईत महिंद्रा बोलेरो वाहन (एमएच 40 सीए 1772) जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पुढील तपास पोउपनि चैतन्य घावटे करीत आहे. पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरू आहे.
































