कटेझरी आणि मर्मा जंगलातील माओवाद्यांची दोन स्मारके पाडली

वृक्षारोपणाने दिला शांततेचा संदेश

नागरिकांच्या उपस्थितीत स्मारके पाडताना पोलीस जवान

गडचिरोली : दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी आणि आपले अस्तित्व दाखविण्यासाठी माओवाद्यांकडून आपल्या मृत सहकाऱ्यांच्या स्मरणार्थ स्मारके उभारली जातात. माओवाद्यांच्या भूतकाळातील हिंसाचाराचे प्रतीक असलेली अशी 2 ते 3 वर्ष जुनी मौजा कटेझरी व मर्मा जंगल परिसरातील दोन स्मारके गडचिरोली पोलीस दलातील जवानांनी नष्ट केली.

कटेझरी पोलीस स्टेशनचे पोलीस पथक आणि एसआरपीएफचे जवान कटेझरी व मर्मा जंगल परिसरात अभियान राबवित असताना, जंगल परिसर शोध अभियानादरम्यान माओवाद्यांनी उभारलेली दोन स्मारके दिसून आली. यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर माओवादी स्मारकांची बॅाम्ब शोधक व नाशक पथकाने (बिडीडीएस) तपासणी केल्यानंतर दोन्ही स्मारके पाडून टाकण्यात आली. स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने सदर दोन्ही स्मारके नष्ट करून, त्या ठिकाणी शांततेचे प्रतीक म्हणून वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी पोलीस पथकाकडून उपस्थित नागरीकांना माओवाद्यांच्या खोट्या भुलथापांना बळी न पडता पोलिसांना सहकार्य करून गावाचा विकास करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात आली आहे. ‘माओवाद्यांच्या दहशतीपासून नागरीकांना मुक्त करण्यासाठी गडचिरोली पोलीस दल प्रयत्नशील आहे. माओवाद्यांच्या अशा स्मारकाला समाजात कुठेच स्थान नसून कोणीही अशा बेकायदेशीर बांधकामांमध्ये सहभागी होऊ नये’ असे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) सत्य साई कार्तिक, तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक धानोरा अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली कटेझरीचे प्रभारी अधिकारी पोउपनि. अजय भोसले, एसआरपीएफ गट 11 चे पोउपनि.कुणाल भारती, तसेच पोस्टे कटेझरीचे पोलीस अंमलदार व एसआरपीएफचे जवान यांनी पार पाडली.