गडचिरोली पोलिसांनी उद्ध्वस्त केला छत्तीसगड सीमेवरील नक्षलवाद्यांचा कॅम्प

450 मीटर उंच टेकडीवर कारवाई

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिक सक्रिय झालेल्या नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना नियंत्रित ठेवण्यासाठी गडचिरोली पोलिसही सतर्क झाले आहेत. छत्तीसगडमधील चुटीनटोला गावाजवळच्या 450 मीटर उंच टेकडीवर जाऊन गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचा कॅम्प उद्ध्वस्त करत त्यांचे साहित्य जप्त केले.

नक्षलवाद्यांच्या कसनसूर-चातगाव दलमसह छत्तीसगडच्या औंधी दलमचे काही सशस्त्र नक्षलवादी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्यासाठी छत्तीसगडमधील मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र सीमावर्ती भागातल्या चुटीनटोला गावाजवळ तळ ठोकून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभियान पथकाच्या जवानांद्वारे सदर जंगल परिसरात अभियान राबविण्यात आले.

पोलिसांचे पथक शनिवारी सकाळी 450 मीटर उंच टेकडीवर पोहोचले. त्यावेळी नक्षलवादी काही वेळापूर्वीच तेथून निघाले होते. डोंगरमाथ्यावरील ठिकाणांवर शोधमोहीम राबविली असता त्या ठिकाणी नक्षलवाद्यांचे आश्रयस्थान आणि छावणी सापडली. ती अभियान पथकाद्वारे नष्ट करण्यात आली.

अत्यंत खडतर प्रदेश आणि पर्वतांचा फायदा घेत नक्षलवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. घटनास्थळावरून कॉर्डेक्स वायर, डिटोनेटर्स, जिलेटिन स्टिक्स, बॅटऱ्या, वॉकी-टॉकी चार्जर, बॅकपॅक असे साहित्य जप्त करण्यात आले. विशेष अभियान पथकाची सर्व पथके रविवारी गडचिरोलीला सुखरूप पोहोचली. यानंतर छत्तीसगड सीमेवर नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.