जंगमपूरच्या जंगलातील मोहादारूच्या अड्ड्यांवर चामोर्शी पोलिसांनी टाकली वक्रदृष्टी

२८ लाखांचा मोहसडवा केला नष्ट

गडचिरोली : दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात होळी आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान दारूचा वापर करण्यासाठी तयार केल्या जात असलेल्या मोहफुलाच्या दारू अड्ड्यावर चामोर्शी पोलिसांनी धाड टाकून तब्बल 28 लाखांचा मोहफूल सडवा नष्ट केला. ही कारवाई जंगमपूर जंगल शिवारातील जंगमपूर नाल्याच्या शेजारी करण्यात आली.

जंगमपूर नाल्याच्या शेजारी आरोपी जुगल लखन दास, देवदास किसन मंडल, सुब्रतो विश्वास यांच्यासह त्यांचे सहकारी (सर्व रा.नेताजी नगर, ता.चामोर्शी) हे मोहाचा सडवा बनवून अवैधरित्या दारू गाळून विक्री करत असल्याची माहिती चामोर्शी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक विश्वास पुल्लरवार यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस उपनिरीक्षक राधिका शिंदे यांच्या नेतृत्वातील पथकाने धाड टाकली. पण पोलिसांना पाहताच आरोपींनी तेथून पळ काढला.

घटनास्थळी पाहणी केली असता 200 लीटर क्षमतेचे 26 प्लॅस्टीकचे ड्रम तिथे होते. त्यामध्ये प्रत्येकी 200 लीटर मोहाफुल सडवा सडवा भरून होता. त्यातील एकूण सडवा 5 हजार 200 लीटर (अंदाजे किंमत 5,20,000) आणि 200 लीटर क्षमतेच्या पांढऱ्या रंगाच्या एकूण 116 प्लॅस्टीकच्या बॅग सडव्याने भरलेल्या होत्या. त्यातील 23 हजार 400 लीटर सडवा (अंदाजे किंमत 23,40,000) असा एकूण 28 हजार 400 लीटर मोहा सडवा (बाजारभावानुसार किंमत 100 रुपये प्रतीलीटरप्रमाणे 28 लाख 40 हजार) मिळून आला.

त्या सडव्याचा नमुना घेऊन घटनास्थळीच पंचासमक्ष तो नष्ट करण्यात आला. यातील आरोपींविरूद्ध चामोर्शी ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिस निरीक्षक विश्वास पुल्लरवार यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक राधिका शिंदे, हवालदार व्यंकटेश येलल्ला, अंमलदार संदीप भिवणकर, मनिषा चिताडे, शिल्पा पोटे, चालक सिंधराम यांनी केली.