कोंबड्यांच्या झुंजीवर चालणारा जुगार पोलिसांनी उधळला

2.24 लाखांचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली : गडचिरोली पोलीस उपविभागांतर्गत येणाऱ्या रेगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोतेपल्ली गावालगतच्या जंगलात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत 6 जणांना अटक करत त्यांच्याकडील 5 दुचाकी वाहने आणि रोख रक्कम मिळून 2 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जिल्ह्याच्या काही ग्रामीण आणि दुर्गम भागात कोंबडा बाजार भरविला जातो. या अवैध कोंबडा बाजारात कोंबड्यांची झुंज लावून त्यावर पैज लावली जाते. अशा पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या जुगारावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सर्व ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यानुसार दि.27 जुलै 2025 रोजी रेगडी ठाण्याच्या हद्दीतील पोतेपल्ली रै. येथे अवैधपणे कोंबड्यांचा बाजार भरवून जुगार खेळवला जात असताना पोलिसांनी तिथे धाड टाकली. मात्र पोलीस आल्याची चाहुल लागताच अनेक जणांनी तेथून धूम ठोकली. त्यातील 6 जण पोलिसांच्या हाती लागले. त्यांची 5 दुचाकी वाहनेही पोलिसांनी जप्त केली. याशिवाय रोख , रोख 11,770 रुपये आणि 3 कोंबडेही जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, एसडीपीओ सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रेगडीचे पोउपनि. कुणाल इंगळे व पोलीस पथकाने केली.

आरोपींमध्ये पांडुरंग चिन्ना तिम्मा (57 वर्षे), ऋषी महारू तिम्मा (60 वर्षे), महेंद्र हिरामण कुलेटी (27 वर्षे), विजय रामजी कुलेटी (50 वर्षे), चौघेही रा.पोतेपल्ली रै, ता.चामोर्शी, तसेच करण कार्तिक बिश्वास (34 वर्षे), रा.शिमुलतला, ता.चामोर्शी जि.गडचिरोली, आणि शामल मथुरा अहीरवार, (35 वर्षे), रा.महाकाली वार्ड नं.12, चंद्रपूर या सहा जणांचा समावेश आहे.

ही कारवाई रेगडीचे प्रभारी अधिकारी पोउपनि.कुणाल इंगळे, नायक मालू पुंगाटी, अंमलदार सचिन निमगळे, शिवा आडे, जितेंद्र बोलीवार, गुलशन आत्राम, संदीप खेडकर, सुनील गेडाम, आशिष सोनमनवार, सुनील मडावी, विवेक घोडीचोर यांनी पार पाडली.