मुलाच्या खुनात सहभागी महिलेला कुऱ्हाडीने वार करत संपविले

3 वर्षानंतर वडिलांनी घेतला बदला

गडचिरोली : ज्या पद्धतीने आपल्या तरुण मुलावर फावड्याने घाव करत त्याचा खून केला, त्याच पद्धतीने वडिलांनी मुलाच्या खुनात सहभागी महिलेवर कुऱ्हाडीने वार करत तिचा खून केला. हा थरार सोमवारी (दि.22) गडचिरोली तालुक्यातल्या पुलखल शिवारात घडला. रामकृष्ण मेश्राम (60 वर्ष) असे आरोपी वडिलांचे, तर ललिता देवराव गेडेकर (55 वर्ष) असे मृत महिलेचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, आरोपी रामकृष्ण मेश्राम यांचा मुलगा कैलास (28 वर्ष) याचा 2022 मध्ये मृत महिला ललिता आणि तिचा मुलगा नरेश देवराव गेडेकर (21 वर्ष) यांनी फावड्याने मारून खून केला होता. याप्रकरणी ललिता ही वर्षभरापूर्वी कारागृहात जामिनावर बाहेर आली होती. पण मृत कैलासचे वडील रामकृष्ण यांच्या मनात असलेला राग शांत झाला नव्हता.

अशातच दि.22 ला ललिता आपल्या शेतात निंदणासाठी गेली असताना रामकृष्ण याने संधी साधून तिला शेतात गाठले आणि कुऱ्हाडीने तिच्यावर हल्ला केला. ललिता जीवाच्या आकांताने पळत सुटली, पण रामकृष्णने तिला बांधीत गाठून तिच्यावर कुऱ्हाडीने वार केले आणि पळ काढला. गडचिरोली पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.