गडचिरोली : आलापल्ली वनविभागातील घोट वनपरिक्षेत्रातील जंगलातून 4 लाख 8 हजार 949 रुपये किमतीच्या सागवान लाकडांची छत्तीसगडमध्ये तस्करी करणाऱ्या वाहनाला पकडण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले. विशेष म्हणजे रात्रीच्या गस्तीदरम्यान पाठलाग करून हे वाहन पकडण्यात आले. या कारवाईत 15 लाख रुपये किमतीचे वाहनही जप्त करण्यात आले. त्या वाहनातील दोघे जण आणि दुचाकीवर असलेले तिघे जण मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले.

प्राप्त माहितीनुसार, घोट वनपरिक्षेत्रातील गरंजी भागात दि.10 च्या मध्यरात्री वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश्वर वाडीघरे आपल्या पथकासोबत गस्तीवर असताना एक मालवाहू वाहन (क्रमांक सीजी 07, सीटी 6735) आणि एक दुचाकी वाहन संशयास्पदरित्या जाताना दिसले. त्यांना तपासणीकरिता थांबविण्याचा इशारा केल्यानंतर वाहन कट मारून वेगाने कोटमीच्या दिशेने पुढे निघाले. त्यामुळे वनविभागाच्या पथकाने पाठलाग करून त्या वाहनाला थांबविले. त्यामुळे वाहनातील दोघे जण वाहन तिथेच सोडून पसार झाले. त्यांच्यासोबत असलेल्या दुचाकीवरून आणखी तिघे जण पळून गेले.
मालवाहू वाहनाची तपासणी केली असता कोणाला संशय येऊ नये म्हणून वरून प्लास्टिक भंगार भरलेल्या चुंगळ्या, तर त्याखाली सागवान प्रजातीची 13 नग लाकडे भरलेली होती. ते वाहन घोट वनपरिक्षेत्र कार्यालयात आणून मालाची तपासणी केली असता 3.427 घटमीटरची 13 ओंडके दिसून आले. सागवान लाकडे आणि वाहनासह एकूण 19 लाख 8949 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास आलापल्लीच्या उपवनसंरक्षक दिपाली तलमले व प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी मोहम्मद आझाद यांच्या मार्गदर्शनाखाली घोटचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश्वर वाडीघरे हे करत आहेत. सदर कारवाईत क्षेत्र सहायक व्ही.एम.ठाकरे, वनरक्षक एन.व्ही.गावडे, जी.सी.राठोड, एस.बी.राठोड, एस.पी.धानोरकर, मंगेश काबेवार, कमलाकर चौधरी, वनरक्षक तथा वाहन चालक प्रवीण श्रीखंडे, आलाम, जीवन बिटपल्लीवार यांनी सहकार्य केले. पळून गेलेल्या पाच आरोपींना पकडण्यासोबत कापलेले सावगान नेमके कोणत्या जंगलातील आहे हे लवकरच स्पष्ट होईल.
आलापल्ली वनविभागात अवैध वृक्षतोड किंवा वन्यप्राणी शिकार तथा इतर वनगुन्ह्यांची कोणाला माहिती असल्यास वनाधिकारी, वनकर्मचाऱ्यांना कळविण्याचे आवाहन आरएफओ एन.एस. वाडीघरे यांनी केले आहे.
































