कुरखेडा : येथील सती नदीपात्रातून अवैधपणे रेती तस्करी करण्यास ऊत आल्याबाबतचे वृत्त ‘कटाक्ष’ने दोन दिवसांपूर्वी दिले होते. त्याची दखल घेत तहसीलदार रमेश कुंभारे यांनी कुरखेडा तालुक्यातील सर्वच रेतीघाटांचे पंचनामे करून कुठून किती रेती गायब आहे याची तपासणी करण्याचे निर्देश कनिष्ठ कर्मचाऱ्यांना दिले आहेत. असे असले तरी रेती तस्करीला पूर्णपणे आळा बसेल का, याबाबत शंका कायम आहे.
नागपूर येथील काही गुंड प्रवृत्तीचे लोक या रेती तस्करीत सक्रिय असून त्यांनी दोन वेळा गस्ती पथकाच्या वाहनाला अडवून कर्तव्यावर असलेल्या महसूल कर्मचाऱ्यांना धमकावल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात पथकातील मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनही दिले. मात्र तरीही रेती तस्करांकडून मुजोरी करत रेती काढण्याचे काम सुरूच असल्याकडे कटाक्षने लक्ष वेधले होते.
सध्या खासगी आणि सरकारी बांधकामासाठी लागणारी रेती अवैध मार्गाने उपसा सुरू असल्याने शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. कुरखेडा परिसरात कोणत्याही रेतीघाटाचा लिलाव झालेला नसल्याने तस्करांचे चांगलेच फावत आहे.