देसाईगंजमार्गे सुगंधी तंबाखूची वाहतूक, पोलिसांनी पकडला २.४ लाखांचा माल

कुठून आला आणि कुठे जात होता, वाचा

गडचिरोली : खर्रा बनविण्यासाठी हमखास वापरला जाणारा २.४ लाखांचा सुगंधी तंबाखू देसाईगंज पोलिसांनी पकडला. एका मालवाहू ट्रकमधून हा तंबाखू जात होता. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली. पण पोलिस कोठडीएेवजी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी दिली. त्यामुळे त्याची रवानगी चंद्रपूर कारागृहात करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, शासनाकडून प्रतिबंधित असलेल्या सुगंधी तंबाखूची देसाईगंजकडून लाखांदूरमार्गे भंडाऱ्याकडे वाहतूक होणार असल्याची माहिती देसाईगंज पोलिस स्टेशनला मिळाली होती. त्यानुसार पो.उपनिरीक्षक धनगर यांनी लाखांदूर मार्गावरील बैद्यनाथ फॅक्टरीजवळ सापळा लावला. यावेळी संबंधित ट्रक आल्यानंतर त्याला थांबवत तपासणी केली असता आत २ लाख ४३ हजार रुपये किमतीच्या सुगंधी तंबाखूच्या डब्या ३४ चुंगळ्यांमध्ये भरून ठेवलेल्या आढळल्या. ट्रकमध्ये किराणा असल्याचे सांगत तो माल ताडपत्रीने झाकलेला होता. पण पोलिसांनी त्याची तपासणी केल्यानंतर हा प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आढळला.

याप्रकरणी आरोपी विनोद गुलाब शेंडे (२४) रा.लवारी, ता.साकोली, जि.भंडारा याला अटक करण्यात आली. पण पीसीआरची मागणी करूनही एमसीआर मिळाल्याची माहिती उपनिरीक्षक धनगर यांनी दिली. तरीही इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

जप्त केलेल्या तंबाखूत ईगल, ओला शिशा आदी तंबाखूच्या डब्या होत्या. हा तंबाखू खर्रा बनविण्यासाठी वापरला जातो. अन्न सुरक्षा अधिकारी तोरेम यांना बोलविल्यानंतर त्यांनी त्या तंबाखूचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले.