दारूच्या 156 कारवायांत 137 आरोपींना अटक, 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

उत्पादन शुल्क विभाग अँक्टिव्ह मोडवर

गडचिरोली : अतिशय अल्प मनुष्यबळ असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाने सक्रियता दाखवत दारूबंदीच्या कारवाया वाढविल्या आहेत. गेल्या एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत, म्हणजे आठ महिन्यात दारूबंदीच्या 156 प्रकरणांमध्ये 137 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 8960 लिटर दारूसह जवळपास 14 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे या विभागाच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीदरम्यान दारू वाहतूक आणि हातभट्ट्यांना आळा घालण्यासाठीही हा विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात 9 तपासणी नाके लावण्यात आले आहेत. त्यासाठी वनविभाग, पोलीस आणि महसूल विभागाचीही मदत घेतली जात आहे. याशिवाय सराईत गुन्हेगारांवर कलम 93 नुसार कारवाईसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच अवैध मद्यसाठा, वाहतूक करण्याची शक्यता असलेल्या संशयितांना नोटीस बजावण्यात आली आहे.

ही निवडणूक निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात पार पडावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत. निवडणुकीदरम्यान मतदारांना कोणी दारूचे प्रलोभन देत असेल, किंवा दारू वाटप करत असेल तर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक संध्याराणी देशमुख यांनी केले आहे.