गडचिरोली : तीन महिन्यांपूर्वी छत्तीसगडमधून माजा हा प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू आणि किराणा सामान आणणाऱ्या कारच्या लुटमार प्रकरणाचा गुंता अजूनही सुटलेला नाही. अनधिकृतपणे सुगंधी तंबाखूची आयात आणि विक्री करण्याच्या व्यावसायिक स्पर्धेतून हे प्रकरण घडले असताना पोलीस मात्र या प्रकरणाच्या खोलात जाऊन तपास करण्याऐवजी हे प्रकरण अडगळीत टाकण्याचा प्रयत्न करत आहे. सुगंधी तंबाखू पुरवठादारांना पाठीशी घालण्याचा तर प्रयत्न होत नाही ना, अशी शंका घेतली जात आहे.
तीन महिन्यापूर्वीच्या (23 एप्रिल 2025) या प्रकरणात गडचिरोलीच्या गोकुळनगरातील रहिवासी आवेश कबीर शेख याने आपले किराणा दुकान असून घटनेच्या दिवशी एका टाटा पंच गाडीतून छत्तीसगडच्या बांदे गावातून किराणा सामान व माजा आणत असताना पेंढरी ते गडचिरोली मार्गावर नवेगावच्या समोर एका कारमधून आलेल्या 7-8 लोकांनी अडवून मला आणि माझ्या सहकाऱ्याला बेदम मारहाण करत ‘गुप्ता के पास जाना, उसको बताना शहा के पास से माल नही लेनेका, बाद मे इधर दिखा तो काट डालुंगा’ असे धमकावत गाडीतील दिड लाखांचा माजा आणि दिड लाखांचा किराणा, तसेच कारच्या डॅशबोर्डच्या ड्रॅावरमधील 50 हजार रुपये, पाकिटातील 23 हजार रुपये आणि मोबाईल असा एकूण 4 लाख 6 हजार रुपयांचा ऐवज जबरीने घेऊन गेल्याची तोंडी तक्रार कारवाफा पोलीस मदत केंद्राकडे केली होती.
रिपोर्टमधील तांत्रिक चुका हेतुपुरस्सर?
या प्रकरणात पोलिसांनी राजोली येथील 6 आणि कुरखेडा तालुक्यातील 3 अशा 9 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र तीन महिन्यांपासून यातील 6 आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाही. गाडीत असलेल्या सामानात दिड लाखांचा माजा असा उल्लेख आहे, पण तो सुगंधी तंबाखू आहे की माजा नावाचे दुसरे काही प्रॅाडक्ट आहे याचा स्पष्टपणे उल्लेख नाही. विशेष म्हणजे टाटा पंच गाडीतील जागा लक्षात घेता दिड लाखात माजा तंबाखूच्या 16 बॅग बसतात. पण सोबत दिड लाखाचा किराणा बसेल एवढी जागा त्या गाडीत असते का, याबद्दलही शंका उपस्थित केली जात आहे. गडचिरोलीमधील एखादा किराणा व्यावसायिक छत्तीसगडमधून किराणा माल आणेल का, हेसुद्धा शंकास्पद आहे. त्या किराणा सामानात कोणकोणते साहित्य होते याची माहिती पोलिसांना नाही. सुगंधीत तंबाखूची आयात करत असल्याप्रकरणी या प्रकरणातील फिर्यादीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांना विचारले असता लुटमारीतील सामान जप्त केल्याशिवाय तशी कारवाई होणार नसल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे या प्रकरणातील फिर्यादीचे किराणा दुकानही नसल्याचे समजते. तो गुप्ता नामक एका सुगंधीत तंबाखू व्यावसायिकासाठी काम करतो. असे असताना पोलिसांनी त्याची अद्याप चौकशी केलेली नाही.
महाविद्यालयीन युवकाला गोवले
या प्रकरणात प्रथम देवनारायण सोनबोईर या महाविद्यालयीन विद्यार्थ्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात वापरलेले वाहन प्रथम याचे असल्याचा संशय घेण्यात आला आहे. त्याला अटकही झाली होती. आता न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला असला तरी त्याला मुद्दाम गोवल्याचा दावा त्याच्या वतीने करण्यात आला आहे. त्याने सध्या आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत केले आहे. या प्रकरणात वापरलेली गाडी त्याची असल्याचा संशय घेतला असला तरी ती गाडी त्याने आधीच विकलेली आहे. असे असताना आपल्याला या प्रकरणात गोवने म्हणजे आपले शिक्षण आणि करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्या युवकाच्या वतीने करण्यात आला आहे.