गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातल्या येमली बुर्गी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील करपनफुंडी गावातल्या वृ्द्ध दाम्पत्याची हत्या करून मृतदेह नदीत फेकल्याप्रकरणी त्या दाम्पत्याच्या तीन पुतण्यांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना 6 दिवसांचा पीसीआर दिला आहे. पण ही हत्या संपत्तीच्याच कारणावरून झाली की अजून कोणत्या, याची खात्री अद्याप झालेली नाही. त्यामुळे या घटनेचे रहस्य आणखी गडद झाले आहे. दरम्यान पीसीआरमध्ये आरोपींना बोलते केल्यानंतर हत्येचे नेमके कारण स्पष्ट होण्यासोबत त्यासंदर्भातील पुरावेही गोळा केले जाणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
दि.27 आॅगस्टला बुरगू रैनू गोटा (65 वर्ष) आणि दुसऱ्या दिवशी रैनू जंगली गोटा (70 वर्ष) या दाम्पत्याचे मृतदेह बांडे नदीत आढळले होते. या रहस्यमय घटनेचा उलगडा करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी पाच पथके तयार केल्यानंतर चार संशयितांना ताब्यातही घेण्यात आले. त्यात तीन सख्खे भाऊ असून ते गोटा दाम्पत्याचे सख्खे पुतणे आहेत. मनोज गोटा, शंकर गोटा आणि देवाजी गोटा या तीन भावडांसह चौथा आरोपी रामसू नरोटी याने त्यांना सहकार्य केले आहे. त्या चौघांनाही न्यायालयाने 6 दिवसांचा पीसीआर दिला आहे.
पुजारी म्हणून काम करणाऱ्या मृत रैनू गोटा यांना एक लहान भाऊ आहे. त्या भावाच्या तीन मुलांनीच आपल्या काकाची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. मात्र जीवे मारण्यापर्यंत वाद विकोपाला जाईल एवढी संपत्ती गोटा यांच्याकडे नसल्याचे समजते. त्यामुळे पोलीस सर्व शक्यता पडताळून पाहात आहेत. आता हे प्रकरण नेमके कोणते वळण घेते हे येत्या दोन दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
व्हिसेरा रासायनिक परीक्षणासाठी पाठविणार
शवपरीक्षणात सदर हत्या श्वास अडकल्याने आणि पाण्यात बुडून बुडाल्याने अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची गळा आवळून हत्या करून नंतर मृतदेह पाण्यात फेकले असण्याची शक्यता आहे. मात्र खात्री करण्यासाठी दोन्ही मृतदेहांचा व्हिसेरा काढला असून तो रासायनिक परीक्षणासाठी पाठविला जाणार आहे. ज्या झोपडीत हे दाम्पत्य राहात होते त्या झोपडीपासून नदीचे अंतर जवळपास 500 मीटर आहे. एवढ्या अंतरापर्यंत मृतदेह खांद्यावरच नेल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली.