चामोर्शी : मांस विक्रीसाठी रानडुकराची अवैधपणे शिकार करणाऱ्या तिघांना वनविभागाच्या पथकाने अटक केली. यात एका महिलेचाही समावेश आहे. ही कारवाई मार्कंडा (कंसोबा) वनपरिक्षेत्राच्या पथकाने केली.

आरोपींमध्ये संध्या रामकृष्ण मल्लिक, अरुण परिमल बाछाड आणि किरण भावेन (सर्व रा.गांधीनगर) यांचा समावेश आहे. त्यांनी शिकार केल्यानंतर रानडुकराचे अवशेष, शिकारीसाठी वापरलेले शस्र आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले. तीनही आरोपींना 6 आॅक्टोबरपर्यंत वनकोठडी सुनावली आहे. त्यांनी यापूर्वी अशाच पद्धतीने वन्यप्राण्यांची शिकार केली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याची चौकशीही होणार आहे.

ही कारवाई उपवनसंरक्षक तलमले आणि सहायक वनसंरक्षक मोहम्मद आझाद यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी तनुजा मोढळे यांच्या पथकाने केली. त्यात क्षेत्र सहायक आर.बनोत, वनरक्षक सोनवणे, अक्षय राऊत व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.












