शेतीच्या वादातून वृद्धाची हत्या करणाऱ्या दोन तरुणांना अटक

हत्येवरील तर्कवितर्कांना पूर्णविराम

भामरागड : शेतातील झाडाखाली शेकोटी करून खाटेवर झोपलेल्या वृद्धाची गळा चिरून रहस्यमयरित्या झालेल्या हत्येची उलगडा करण्यात नेलगुंडा पोलिसांना यश आले. दोन तरुणांनी शेतीच्या वादातून ही हत्या केल्याचे स्पष्ट झाले. त्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

प्रकाश विज्या वाचामी (23 वर्ष) आणि दीपक दोगे वड्डे (24 वर्ष) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. गेल्या 10 जानेवारीला पुसू नरंगो हबका (66 वर्ष) या वृद्धाची हत्या झाली होती. शेजारच्या खाटेवर पुसू हबका यांची पत्नीही झोपली होती. आरोपींनी कुऱ्हाडीने गळ्यावर वार करून ही हत्या करून अंधाराचा फायदा घेत पळ काढला.

नक्षलदृष्ट्या संवेदनशिल परिसर असल्याने ही हत्या करणारे कोण, आणि त्यामागे कोणते कारण आहे याचे गुढ वाढले होते. पण उपनिरीक्षक अमोल साळुंके, अंमलदार विक्रम बुरंगे, पतीराम मडावी आणि सहकाऱ्यांनी आरोपींचा शोध लावला. आरोपींना दोन दिवसांचा पीसीआर मिळाला आहे.