कोरची : जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील कोटगुल पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आणि आणि छत्तीसगडमधून काही दुचाकी वाहनांची चोरी करणाऱ्या दोन युवकांना अटक करण्यात कोटगुल पोलिसांना यश आले. चौकशीत त्यांनी 9 वाहने चोरी केल्याची कबुली दिली. ती सर्व वाहनाने पोलिसांनी जप्त केली.

जिल्ह्रात वाहन चोरीचे प्रकार वाढले असल्याने त्याबाबत कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिले होते. कोटगुल पोलीस स्टेशनमध्ये वाहन चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पो.उपनिरीक्षक दयानंद शिंदे यांनी दि.25 मार्च रोजी आरोपी प्रदीपकुमार फुलसिंग कोडापे (19 वर्षे) याची ओळख पटवली. गोपनिय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तो टेमली, ता.मोहल्ला, जि.मानपूर-मोहल्ला (छ.ग.) येथील रहिवासी असल्याचे समजले. त्यामुळे त्याला तेथून चौकशीसाठी ताब्यात घेतले. आरोपीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने त्याचा सहकारी टेमनलाल रामखिलावन साहू (19 वर्षे) रा.चिलमगोटा ता.दौंडी लोहारा, जि.बालोद (छ.ग.) याच्यासोबत मिळून एका दुचाकी चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्याच्या सहकाऱ्यालाही अटक करण्यात आली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
यादरम्यान आरोपींनी महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या हद्दीत चोरलेल्या 9 दुचाकींची माहिती दिली. त्यांची अंदाजे किंमत 3 लाख 15 हजार रुपये आहे. पुढील तपास पोउपनि. दयानंद शिंदे करीत आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोटगुल येथील पोउपनि. कृष्णा सोळंके यांच्या नेतृत्वात पोउपनि.शिंदे, हवालदार भजनराव कोडाप, श्यामलाल नैताम, अंमलदार विनय सिध्दगु, किशोर बावणे, अनिल मडावी यांनी पार पाडली.