अहेरीतील आयपीएलच्या ऑनलाईन सट्ट्यात तेलंगणातील दोन बुकींना अटक

एकूण आरोपींची संख्या गेली 12 वर

गडचिरोली : अहेरी येथील बालाजी गेस्ट हाऊसवर बनावट अॅपच्या माध्यमातून आयपीएलवर सट्टा लावण्याचा प्रकार गेल्या 27 एप्रिल रोजी उघडकीस आला होता. याप्रकरणी अहेरी पोलिसांनी 10 आरोपींना अटक केली होती. त्यात आता आणखी दोन आरोपींची भर पडली असून तेलंगणा राज्यातून दोन बुकींना पकडण्यात अहेरी पोलिसांना यश आले आहे. यामुळे सट्ट्यातील एकूण आरोपींची संख्या 12 झाली आहे.

सध्या देशात आयपीएलचा सिझन सुरु असल्याने त्यावर चालणाऱ्या अवैध सट्टाबाजाराला आळा घालण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सर्व ठाण्यांना दिले होते. त्यानुसार अहेरीत अपर पोलिस अधीक्षक एम.रमेश, उपविभागीय पोलिस अधिकारी (अहेरी) अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनात अहेरी ठाण्याचे पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे, पोउपनि जनार्धन काळे, पोउपनि गवळी आणि सहकाऱ्यांनी छापा टाकून आयपीएलवरील सट्टा उघडकीस आणला होता.

या प्रकरणात आतापर्यंत निखिल मलय्या दुर्गे, आसिफ फकीर मोहम्मद शेख, धनंजय राजरत्नम गोगीवार, निखील गुंडावार, प्रणित श्रीरामवार, अक्षय गनमुकलवार, फरमान शेख, फरदिन पठाण, इरफान ईकबाल शेख सर्व रा.अहेरी, संदीप गुडपवार रा.आल्लापल्ली यांच्या विरुध्द कलम 420 भादंवि तसेच कलम 4 व 5 महाराष्ट्र जुगारबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आता तेलंगणा राज्यातील बुकी शेख जमशेद पाशा बशीर शेख, (32 वर्षे) रा.बिबरा पो.दहिगाम जि.आसिफाबाद (तेलंगणा) आणि रवि लसमय्या गडीरेड्डी (28 वर्षे) रा.मुत्तमपेठ, जि.कुमरामभिम (तेलंगणा) यांना ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींचा आयपीएल जुगारात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सपोनि विजय चव्हाण, उपनिरीक्षक करीश्मा मोरे, साखरे, मरस्कोल्हे, हवालदार लोहंबरे, शेंडे, अंमलदार पानेम, कुमराम व चालक सिडाम यांनी पार पाडली. अशा प्रकारच्या अवैध सट्टेबाजीपासून नागरिकांनी दूर राहुन जर कोणी असे अवैध व्यवसाय चालवित असतील त्यांची माहिती पोलिस विभागाला देण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.